मराठी विश्वकोश ऍपचे आज लोकार्पण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

वाई - महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई व वाचन जागर अभियान, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त उद्यापासून (ता.12) येथे तीन दिवस ग्रंथप्रदर्शन व मराठी विश्वकोश मोबाईल ऍप लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

वाई - महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई व वाचन जागर अभियान, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त उद्यापासून (ता.12) येथे तीन दिवस ग्रंथप्रदर्शन व मराठी विश्वकोश मोबाईल ऍप लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

येथील विश्वकोशाचे एक ते 20 खंड प्रकाशित झाले असून, हे सर्व खंड शासनकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. बदलते तंत्रज्ञान लक्षात घेऊन हे सर्व खंड सर्वसामान्य वाचकांना मोबाईल/ टॅबमध्ये उपलब्ध व्हावेत, यासाठी मराठी विश्वकोशाचे ऍप तयार करण्यात आले आहे. हे ऍप वाचकांना वापरण्यास सहज आणि सोपे असून, याव्दारे नोंदनिहाय, विषयनिहाय आणि खंडनिहाय नोंदींचा माहितीचा शोध घेता येईल. ग्रंथ क्षेत्रामध्ये समरसून काम करणाऱ्या बुकगंगा कॉम या संस्थेने हे ऍप तयार केले आहे. या ऍपच्या लोकार्पण सोहळ्यानंतर हे ऍप गुगल प्ले स्टोअरवरून वाचकांना विनामूल्य डाउनलोड करता येईल. 

येथील महागणपती घाटावरील काशीविश्वेश्वर मंदिरात शुक्रवारी ग्रंथप्रदर्शनाचे उद्‌घाटन व मराठी विश्वकोश मोबाईल ऍपचे लोकार्पण मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबळेकर यांच्या हस्ते सकाळी 11.30 वाजता होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंडळाचे सदस्य दत्तात्रय पाष्टे, माधव चौंडे, मंदार जोगळेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी बुकगंगा आदी उपस्थित राहणार आहेत. 

मराठी विश्वकोश कार्यालयातर्फे शुक्रवारपासून (ता. 12) सोमवारअखेर 
(ता.15) सकाळी नऊ ते रात्री आठपर्यंत ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, या प्रदर्शनात सर्व शासकीय प्रकाशने, महाराष्ट्रातील मान्यवर प्रकाशकांची पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. याचा विद्यार्थी, नागरिक व मराठी वाचक प्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या  सचिव श्रीमती सुवर्णा पवार व सहायक सचिव डॉ. जगतानंद भटकर यांनी केले आहे.

Web Title: satara news wai Marathi Encyclopedia App Today Launchers