‘राष्ट्रवादी युवक’साठी वाई-साताऱ्यात रस्सीखेच

‘राष्ट्रवादी युवक’साठी वाई-साताऱ्यात रस्सीखेच

ॲड. विजयसिंह पिसाळ व नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांतून होणार निवड

सातारा - विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून राष्ट्रवादीने पक्ष संघटनेचा पाया मजबूत करण्यावर भर दिला आहे. सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या विविध सेलच्या निवडी या याच व्यूहरचनेचा भाग आहे. ‘युवक’च्या अध्यक्षपदासाठी वाईचे ॲड. विजयसिंह पिसाळ व साताऱ्यातील नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. श्री. पिसाळ हे शांत व अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे, 

तर श्री. खंदारे हे आक्रमक पिंडाचे कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. 
पक्षाचा वरून आलेला कार्यक्रम राबविण्याशिवाय कोणताही ठोस कार्यक्रम ‘राष्ट्रवादी युवक’ला जिल्ह्यात राबविता आला नाही. नाही म्हणायला विरोधी नेत्यांच्या पुतळ्यांचे दहन आणि निषेधाचे काही उपक्रम झाले. मात्र, युवा वर्गाला आकर्षित करू शकेल, अशा उपक्रमांची नावे पक्षाच्या येथील नेत्यांनाही चटकन सांगता येणार नाहीत, अशी युवा सेलची परिस्थिती आहे.

युवा संघटनेचा केवळ उपयोग केला जातो, असा काही कार्यकर्त्यांचा ‘फादर बॉडी’वर आरोप आहे. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत जास्तीतजास्त युवकांना संधी द्यावी, असे संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना सूचित केले होते. ‘साहेबांचा’ शब्द प्रमाण मानणाऱ्या वरिष्ठ नेत्यांनी मात्र, सातारा जिल्ह्यात हे सूत्र काही केल्या पाळले नाही. त्यामुळे युवक संघटन अधिक खोकले होत गेले. 

आज या युवा संघटनेला नैराश्‍याच्या गर्तेतून बाहेर काढायचे असेल, तर व्यापक लोकसंघटन, दांडगा संपर्क, युवकांना आकर्षित करू शकणारे कार्यक्रम, सत्ताधारी भाजपच्या विरोधात रान उठविणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. त्यादृष्टीने ‘राष्ट्रवादी’ युवकच्या अध्यक्षपदाच्या निवडीकडे पाहात आहे. वयाच्या निकषानुसार वाईचे ॲड. पिसाळ व साताऱ्यातील खंदारे ही दोन नावे आघाडीवर आहेत. श्री. पिसाळ यांना आमदार (कै.) मदनराव पिसाळ यांचा राजकीय वारसा आहे. मातोश्री अरुणादेवी पिसाळ यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले आहे.

शशिकांत पिसाळ यांनीही जिल्हा परिषदेवर काम पाहिले आहे. उच्चशिक्षित असलेल्या ॲड. पिसाळ यांनी गेल्या दोन वर्षांत वाईत चांगले संघटन उभे केले आहे. मंचच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात ते सक्रिय झाले आहेत. 
नगरसेवक खंदारे यांचे संघटन कौशल्य चांगले आहे. यापूर्वी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. ‘आक्रमकता हाच बचावाचा सर्वोत्तम मार्ग आहे’ या तत्त्वज्ञानाला अनुसरून श्री. खंदारे यांच्या कामाची पद्धत सातारकरांनी ते नगरसेवक झाल्यापासून पाहिली आहे. अंगावर येणाऱ्याला शिंगावर घेण्याची क्षमता ते बाळगून आहेत. याच आक्रमकतेमुळे  ते स्वत: काही वेळा अडचणीतही आले आहेत. मात्र, त्याची पर्वा ते करत नाहीत. पिसाळ व खंदारे या दोघांतून एकाची निवड पक्षाला करायची आहे.

शिवेंद्रसिंहराजे भोसले व मकरंद पाटील आग्रही 
दोन्ही नावांसाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व मकरंद पाटील आग्रही आहेत. त्यामुळे कोणाला संधी द्यायची यावरून एकमत होत नाहीये. ‘मिस्टर क्‍लीन’बरोबरच आक्रमक कार्यकर्त्याच्या हातात युवक संघटनेची सूत्रे देण्याचा मधला व सर्वमान्य पर्याय पुढे येऊ शकतो. संघर्ष टाळून दोघांच्याही कौशल्याचा लाभ पक्षाला करून घेण्याच्या दृष्टीने अध्यक्षाबरोबरच कार्याध्यक्षपदही निर्माण केले जाण्याची शक्‍यता पक्षातील सूत्रांनी व्यक्त केली. पक्षाचे जिल्ह्यातील नेते काय निर्णय घेतात, याकडे सर्वांची लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com