उशाला धरण, डोईवर हंडा... सांगा कसा ओलांडावा ओढा?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

ढेबेवाडी - पाणीपुरवठ्याची विहीर जलाशयात बुडाल्याने उमरकांचन येथील धरणग्रस्तांना पर्यायी विहिरीपर्यंत पोचण्यासाठी वाहता ओढा ओलांडून जावे लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आणि त्यात ओढ्याला असलेल्या वेगवान प्रवाहाकडे दुर्लक्ष करूनच येथील महिलांना पिण्याच्या पाण्याने भरलेले हंडे डोक्‍यावरून आणण्याची कसरत करावी लागत आहे. 

मराठवाडी धरणाच्या बुडीत क्षेत्रात मेंढ, घोटील, उमरकांचन येथे प्रतिवर्षीच्या पावसाळ्यात जलाशयातील पाण्याचा फुगवटा वाढतो. त्यामुळे मेंढ येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिर व घरांना पाण्याचा वेढा पडला आहे. उमरकांचन येथील खालच्या आवाडातील विहीर, स्मशानभूमी पाण्यात आहे. त्यामुळे तेथे पाणीपुरवठ्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला असून कृष्णा खोऱ्याकडून टॅंकर सुरू करण्याची गरज आहे. गावचे पुनर्वसन सांगली जिल्ह्यात झाले असले तरी, बहुतांश कुटुंबे मूळ गावात वास्तव्याला आहेत. परंतु, तेथील विहीर पाण्याखाली असल्याने खालच्या आवाडातील रहिवासी प्राथमिक शाळेच्या पाठीमागे ओढ्याकाठी असलेल्या विहिरीतून डोक्‍यावरून घागरीने पाणी आणत आहेत. त्यासाठी घागरी घेऊनच गावातील महिला दुथडी भरून वाहणारा ओढा ओलांडत आहेत. शेवाळामुळे ओढ्यातील खडक निसरडे झाल्याने दुर्घटनेची भीती आहे. त्यामुळे अनेकदा गावातील पुरुष ओढ्यावर थांबून भरलेल्या घागरी ओढ्यापलीकडे आणून देत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी अशी वणवण सुरू असतानाही जबाबदार अधिकारी गावाकडे फिरकत नाही, हे विशेष.

पावसाळा आला की अंगावर काटाच येतो. घराला पाण्याचा वेढा हायं. पण, प्यायला पाणी न्हायं. हा वनवास बघण्यापेक्षा डोळं कायमचं झाकलं असतं तर बरं झालं असतं.  
श्रीमती राधाबाई मोहिते  (धरणग्रस्त)