पाणीटंचाईचे संकट यंदा कमीच

संजय शिंदे
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

सातारा - जलयुक्त शिवार योजना, मनरेगासह अन्य योजनांतून केलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे यंदा जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यांतील भूजल पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत टंचाईची झळ कमी बसणार आहे.

सातारा - जलयुक्त शिवार योजना, मनरेगासह अन्य योजनांतून केलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे यंदा जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यांतील भूजल पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत टंचाईची झळ कमी बसणार आहे.

मागील पाच वर्षांच्या मार्चमधील सरासरी पाणीपातळीचा विचार करता सर्वच तालुक्‍यांतील पाणीपातळी वाढली आहे. विशेषतः दुष्काळी माण व खटाव तालुक्‍यांत यंदा एक मीटरपेक्षा जास्त पातळी वाढली आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारण कामाचे फलित आता दिसू लागले आहे. यंदा टंचाईची धग कमीच असणार आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात ही बाब स्पष्ट झाली आहे. १०६ पैकी ८४ विहिरींतील पाणीपातळी वाढली आहे. हवामानात बदल होत असल्याच्या सध्याच्या काळात भूजलाचे नियोजन व व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. लोकसहभागातून जलसंधारण व वृक्षारोपण कामात सातत्य राहिले तरच टॅंकर बंद होण्यास मदत होईल, असे मत भूजलतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

गावपातळीवर उदासीनता
भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक गावात एक निरीक्षण विहीर निश्‍चित करण्यात आली आहे. संबंधित गावातील जलसुरक्षक, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पाणीपातळी घेण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. पाणीपातळीच्या नोंदी ठेवण्यासाठी नोंदवही, मार्गदर्शक पुस्तिका व मोजमाप घेण्यासाठी टेप देण्यात आलेले आहेत. ग्रामपंचायतीची भूमिका महत्त्वाची असूनही त्याकडे दुर्लक्ष होते. 

जलयुक्त शिवार अभियानासह लोकसहभागातून जिल्ह्यात जलसंधारणाची चांगली कामे होत आहेत. त्याचा परिणाम यंदा वाढलेल्या भूजल पातळीतून दिसत आहे. अडवलेले पाणी जिरण्याला मदत झाल्याने यंदा टंचाईची तीव्रता तुलनेत कमी जाणवणार आहे. जलसंधारण कामांमुळे काही ठिकाणी टॅंकर बंद झाले आहेत.
- संजय पाटील, उपजिल्हाधिकारी

भूजल पातळीत  तालुकानिहाय झालेली वाढ
(मीटरमध्ये)
खंडाळा -१.३९, खटाव- १.६३, कोरेगाव-१.२१, माण-१.३३, वाई-१.१२, महाबळेश्‍वर -०.३३, पाटण-०.१४, फलटण-०.४०, सातारा-०.२१, जावळी - ०.६४, कऱ्हाड -०.३४.

Web Title: satara news Water shortage crisis this year