टॅंकरचा चेंडू आता ‘भूजल’च्या कोर्टात!

टॅंकरचा चेंडू आता ‘भूजल’च्या कोर्टात!

टॅंकर सुरू असलेल्या व नव्याने मागणी करणाऱ्या गावांचे भवितव्य टांगणीला

कोरेगाव - पावसाने दडी मारल्यामुळे टंचाईची परिस्थिती कायम असल्याने तालुक्‍यातील ३५ गावे अद्यापही तहानलेली आहेत. त्यापैकी २४ गावांना सध्या टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यात टॅंकरच्या मागणीमध्ये आणखी तीन गावांची भर पडली आहे. दरम्यान, टंचाईच्या तीस जूनपर्यंतच्या शासकीय ‘डेडलाईन’ च्या पार्श्‍वभूमीवर भूजल सर्वेक्षण यंत्रणेला ’फेरसर्वेक्षण करण्याच्या सूचना प्रशासनाने आजच दिल्याने यापूर्वी टॅंकर सुरू असलेल्या व टॅंकरची नव्याने मागणी करणाऱ्या गावांचे भवितव्य आता ‘भूजल’च्या पाहणी अहवालावरच अवलंबून आहे.

जुलै महिन्याचा पहिला पंधरवडा संपत आला, तरी तालुक्‍यात पुरेसा पाऊस झाला नाही. जूनमध्ये सरासरी केवळ पाच मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या पावसाने दडी मारल्यामुळे तालुक्‍यामध्ये टंचाईची परिस्थिती कायम आहे. परिणामी भावेनगर, तडवळे (संमत वाघोली), पिंपोडे बुद्रुक, रणदुल्लाबाद, सर्कलवाडी, चौधरवाडी, रामोशीवाडी, भंडारमाची, अनभुलेवाडी, देऊर, वाठार स्टेशन, मोरबेंद, गुजरवाडी (पळशी), विखळे, जांब खुर्द, जगतापनगर, रुई, भाटमवाडी, शेल्टी, बोधेवाडी (भाडळे), करंजखोप, दुधनवाडी, फडतरवाडी, चिलेवाडी या २४ गावांना सध्या १४ टॅंकरद्वारे ४१ खेपांच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे. याशिवाय विहीर अधिग्रहणाद्वारे शेंदूरजणे, चांदवडी, खिरखिंडी, वाघोली, मध्वापूरवाडी, होलेवाडी, हासेवाडी, नागेवाडी या आठ गावांची तहान भागवण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. दरम्यान, आसनगाव, नायगाव, अरबवाडी या गावांचीही टॅंकरची मागणी आहे. दरम्यान, टंचाईच्या तीस जूनपर्यंतच्या शासकीय ‘डेडलाईन’च्या पार्श्‍वभूमीवर नव्याने होऊ लागलेली टॅंकरची मागणी मंजूर होणार का? असा प्रश्‍न आहे. 

सध्या टॅंकर सुरू असलेल्या व टॅंकरची नव्याने मागणी करणाऱ्या गावांचे फेरसर्वेक्षण करण्याच्या सूचना भूजल सर्वेक्षण यंत्रणेला देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ‘भूजल’च्या पाहणी अहवालावरच टॅंकरबाबतचा अंतिम निर्णय अवलंबून आहे.
- एस. जी. पत्की, उपअभियंता, पाणीपुरवठा उपविभाग, कोरेगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com