खटाव, माणला मिळणार आश्‍वासक पाणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

‘पाटबंधारे’त पाणी वितरणाची जबाबदारी स्वतंत्र विभागाकडे; नियोजन होणार

सातारा - पाटबंधारे विभागातून ‘कृष्णा सिंचन’ आणि ‘सातारा सिंचन’ हे दोन विभाग स्वतंत्र झाले आहेत. ‘कृष्णा सिंचन’कडे उरमोडी, कण्हेर या प्रकल्पांचा समावेश झाला आहे. पाणी वितरणाची जबाबदारीही स्वतंत्र विभागाकडे असल्याने या प्रकल्पातून खटाव, माण तालुक्‍यांना वेळेत व पुरेसे पाणी मिळू शकेल. शेतकऱ्यांना शेतीसाठीही पुरेसे व कमी दरात पाणी उपलब्ध होईल, तसेच वसुलीतील अडथळेही दूर होणार आहेत.  

पाटबंधारे विभागाचे ‘सातारा सिंचन’ विभाग आणि ‘कृष्णा सिंचन’मध्ये विभाजन झाले असून, ‘कृष्णा सिंचन’मध्ये उरमोडी, कण्हेर प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. ‘सातारा सिंचन’मध्ये धोम आणि धोम- बलकवडी प्रकल्पाचा समावेश केला आहे. यात प्रकल्पांची कामे करणारा विभाग आणि पाणी वितरण करणारा विभाग असे दोन स्वतंत्र झाले आहेत.

यापूर्वी एकाच विभागावर सर्व कामाची जबाबदारी असल्याने पुरेसा पाणीसाठा असतानाही पाण्याचे वितरण व्यवस्थित होत नव्हते. ज्या भागासाठी हे प्रकल्प सुरू केले आहेत, त्या भागाला पुरेसे पाणी देता येत नव्हते. आता पाणी वितरणाची जबाबदारी स्वतंत्र विभागावर दिल्याने दुष्काळी तालुक्‍यातील जनतेला पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी वेळेवर उपलब्ध होईल, अशी आशा आहे. 

उरमोडी व कण्हेर हे दोन प्रकल्प कृष्णा सिंचन विभागाकडे हस्तांतरीत झाल्याने आता दुष्काळी खटाव, माण या भागाला उरमोडीचे पाणी वेळेत मिळू शकणार आहे. यापूर्वी उरमोडी व कण्हेरचे पाणी खटाव, माण आणि सांगली जिल्ह्यालाही सोडले जात होते. त्यासाठी वर्षातून ‘उरमोडी’ची चार आवर्तने होत होती. ही आवर्तने देताना पाण्याचा दरही जास्त होता आणि पाणी देण्याची सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळत नव्हते. अनेकदा दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर पाणी दिल्याने त्याची पाणीपट्टी जास्त असल्याने ती थकीत राहायची. ही वसुली करण्यासाठी टंचाईतून पैसे घ्यावे लागत होते; पण आता हा प्रकल्प ‘कृष्णा सिंचन’मध्ये समाविष्ट झाल्याने सिंचनाच्या चांगल्या सुविधा होऊन शेतकऱ्यांना कमी पाणीपट्टीत शेती व पिण्याचे पाणी उपलब्ध होऊ शकेल. या प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले आहे. 

आता केवळ माण तालुक्‍यातील कालवे व वितरिकांची कामे राहिली आहेत. तीही आता वेळेत पूर्ण होऊन उरमोडीचे शाश्‍वत पाणी खटाव, माणला मिळेल, अशी आशा आहे. 

सिंचन मंडळावर पाणी वितरणाची जबाबदारी 
प्रकल्पातील पाणी वितरणाची जबाबदार सिंचन मंडळावर टाकण्यात आली आहे. त्यामुळे पूर्ण झालेल्या प्रकल्पांतील पाणी वेळेत व पुरेशा प्रमाणात दुष्काळी भागाला मिळण्यातील अडचणी दूर होऊ शकतील. त्याचा फायदा दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसह जनतेला होणार आहे.