सातारा शहरांतील हेल्मेटसक्ती मागे घेतल्याने स्वागत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

सातारा - शहरामध्ये हेल्मेटसक्ती करणार नसल्याच्या पोलिस प्रशासनाच्या निर्णयाचे आज जिल्ह्यातील सर्वच नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. लोकभावना रोखठोकपणे प्रशासनापर्यंत पोचविल्याबद्दल ‘सकाळ’चेही अनेक नागरिकांनी अभिनंदन केले.

सातारा - शहरामध्ये हेल्मेटसक्ती करणार नसल्याच्या पोलिस प्रशासनाच्या निर्णयाचे आज जिल्ह्यातील सर्वच नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. लोकभावना रोखठोकपणे प्रशासनापर्यंत पोचविल्याबद्दल ‘सकाळ’चेही अनेक नागरिकांनी अभिनंदन केले.

शनिवारपासून (ता. १५) कोल्हापूर परिक्षेत्रात हेल्मेटसक्ती होणार असल्याचे वृत्त आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांमध्ये खळबळ उडाली. शहर आणि वाहनांचा वेग कमी असतो अशा ग्रामीण भागात हेल्मेटसक्ती अव्यवहार्य असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. त्यामुळे अनेकांच्या संतप्त प्रतिक्रिया आल्या. नागरिकांच्या भूमिका विचारात घेत लोकप्रतिनिधीनींही या निर्णयाविरोधात दंड थोपडले. ‘सकाळ’नेही जनमताचा हा आवाज प्रशासनापर्यंत खंबरीपणे मांडला. त्याचबरोबर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील व पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासमोरही जनतेची गाऱ्हाणी मांडली. नागरिकांच्या विरोधाला सकारात्मक घेत श्री. नांगरे- पाटील यांनी शहरामध्ये, तसेच वाहनांचा कमी वेग असलेल्या रस्त्यांवर हेल्मेटसक्ती करणार नसल्याची भूमिका जाहीर केली. पोलिस अधीक्षकांनीही सर्वसामान्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास दिला जाणार नसल्याचे सांगितले. पोलिस प्रशासनाच्या या भूमिकेचे आज सर्वच स्तरांतून स्वागत झाले.

दरम्यान, आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी आज सकाळी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांची भेट घेऊन अभिनंदन केले. महामार्गावर वेग मर्यादा जास्त असते. त्यामुळे तेथे दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातले पाहिजे; परंतु शहरामध्ये वाहनांचा वेग अत्यंत कमी असतो, त्यामुळे सातारकरांचा या निर्णयाला विरोध होता. सातारकरांच्या भावना ध्यानात घेऊन आम्ही या निर्णयाविरुद्ध आवाज उठवला होता. मात्र, नागरिकांच्या भावनांचा आदर करून तातडीने हेल्मेटसक्तीचा निर्णय मागे घेतल्याबद्दल सातारकरांच्या वतीने आभार मानत असल्याचे त्यांनी अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या वेळी आमदार भोसले यांनी ‘सकाळ’ने घेतलेल्या रोखठोक भूमिकेचेही कौतुक केले, तसेच जनभावनांच्या मागे ठाम उभे राहिल्याबद्दल आभारही मानले.

हेल्मेटसक्तीने महिलांना होणाऱ्या त्रासाबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या मनीषा मगर यांनीही सकाळ व पोलिस प्रशासनाचे आभार मानले. ‘सकाळ’च्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना हेल्मेटसक्ती विरोधातील भूमिका निर्भीडपणे मांडता आल्या. त्या भावनांचा आदर राखून श्री. नांगरे- पाटील व श्री. संदीप पाटील यांचेही त्यांनी आभार मानले. त्याचबरोबर महामार्गावर हेल्मेट सक्तीबरोबरच, शहरामध्ये वेगात वाहने चालविणाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. 

हेल्मेटसक्तीबाबत ‘सकाळ’कडे प्रतिक्रिया दिलेल्या सर्वच नागरिकांनी आज दूरध्वनीवरून, तसेच व्हॉटस्‌ॲपद्वारे सकाळ व पोलिसांचे अभिनंदन केले. लोकहिताच्या कोणत्याही निर्णयाबाबत यापुढे ‘सकाळ’च्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले.

पोलिसांकडून लोकभावनेचा आदर 
शहरात मोटारसायकलवरून फिरताना दहा ठिकाणी एक किलोमीटरच्या अंतरात कामासाठी दहा वेळा थांबावे लागते, त्यात हेल्मेट सांभाळायचे की ते काम करायचे? हा प्रश्‍न होता. सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट आवश्‍यक आहे. मात्र, शहराचे असणारे क्षेत्रफळ, वाहनांचा वेग याचा विचार करता पोलिसांनी घेतलेला निर्णय हा लोकभावनेचा आदर करणारा आहे. कायदा पाळताना व्यवहारही महत्त्वाचा आहे. त्यामुळे कायदा व व्यवहाराची सांगड घालण्यात ‘सकाळ’ची भूमिका महत्त्वाची आहे.      
- प्रदीप मराठे, कऱ्हाड. 

पोलिसांचा अभिनंदनीय निर्णय 
शहरात हेल्मेटसक्तीची आवश्‍यकता नव्हती. ती लोकभावना पोलिस, प्रशासनापर्यंत पोचवण्याचे काम ‘सकाळ’ने केले आहे. त्याची दखल घेत पोलिसांनी शहरात हेल्मेट वापरावर शिथिलता आणत अभिनंदनीय निर्णय घेतला आहे. महिलांना शहरात मोटारसायकल चालवताना हेल्मेट वापरण्यापेक्षा ते वागवणे त्रासदायक होते. त्यामुळे हेल्मेट वागवण्यामुळे अपघात होण्याची भीती होती, ती आता दूर झाली आहे. 
- छाया पवार, विद्यानगर.

हेल्मेट सांभाळण्याचे होते टेन्शन 
‘सकाळ’ने शहरातील नागरिकांची विशेषत: महिलांच्या हेल्मेटबाबत अडचणी मांडल्या, त्याची दखल पोलिसांनी घेऊन शहरामध्ये हेल्मेटसक्ती नसल्याचे जाहीर केल्यामुळे पोलिस व सकाळचे अभिनंदन. हेल्मेटसक्तीमुळे हेल्मेट घालून वाहन चालवण्यासह ते सांभाळण्याचे टेन्शन होते. मुलांना शाळेत, शिकवणीला ने- आण करणे, मंडईत जाणे यासाठी दिवसभरात होणारे हेलपाटे व त्यात हेल्मेट सांभाळणे दिव्य होते. मात्र, पोलिसांनी घेतलेल्या निर्णयामुळे टेन्शन कमी झाल्याचे समाधान वाटते.  
- विजया पवार, गृहिणी, कऱ्हाड.

मा. विश्वास नांगरे-पाटील 
पोलिस महानिरीक्षक, 
कोल्हापूर 

जाहीर धन्यवाद!

आपण १५ जुलैपासून हेल्मेटसक्ती शहरातूनही लागू करण्याचा जो निर्णय घेतला होता, तो अन्यायकारक ठरणारा असल्याने मी हा निर्णय रद्द करावा, असे आवाहन केले होते. ‘सकाळ’ने तो विषय लावून धरला. जनतेच्या प्रश्नावर भूमिका घेण्याच्या परंपरेनुसार ‘सकाळ’ने तर त्यावर स्फूट लिहून अडचणी तर मांडल्याच शिवाय वाचकांनाही आवाहन केले, त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला. सर्वच लोकप्रतिनिधींनीही मत मांडून ती अयोग्य असल्याचे सुचविले. 

आपण या सर्व गोष्टींचा सकारात्मक विचार करून शहरांत हेल्मेटसक्ती लागू न करण्याचा निर्णय घेतलात याबद्दल मी व्यक्तिशः व सर्वच शहरांतील हजारो नागरिक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक आपले मनःपूर्वक आभारी आहोत.

आपण जनहितासाठीचे असे निर्णय यापुढे प्रस्तावित कराल तेव्हा ते घेण्यापूर्वी सर्व स्टेक होल्डर्सशी चर्चा करावी, अशीही नम्र विनंती आहे,
पुनःश्‍च धन्यवाद!
- अरुण गोडबोले