नफेखोर वृत्तीचे लाड नेमके कशासाठी?

शैलेन्द्र पाटील
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

पोलिस, पालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांच्या बोटचेप्या धोरणाचा परिणाम

पोलिस, पालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांच्या बोटचेप्या धोरणाचा परिणाम

पालिका व पोलिस प्रशासनाच्या संवेदना बोथट झाल्या आहेत. केवळ ‘जय हो...’ म्हणण्यापुरतेच आपण आहोत, अशी काही मंडळींची धारणा झाली आहे. त्यामुळे ती पदाने मिळालेल्या अधिकाराचा वापर करण्याचे धारिष्ट्य दाखवत नाहीत. ‘काय-काय म्हणून आम्ही करायचे,’ असं म्हणून काहीच करायचे नाही. पोलिस खात्याची जणू ही कार्यपद्धतीच होऊन बसली आहे. कोणी फळकूटदादा विनापरवानगी चक्क राजवाड्यापुढे स्टॉल मांडून कायद्याला आव्हान देतो आणि पोलिस मात्र ‘घेतलाय..., घेतलाय त्यांनी स्टॉल मागे...’ असे म्हणत कारवाईतून अंग काढून घेते. दोन्ही विभागांची ‘खाओ खुजाओ, बत्ती बुझाओ’ ही वृत्ती शहराच्या शिस्तीस मारक ठरत आहे. 

दिवाळी असो अगर रंगपंचमी, १५ ऑगस्ट असो अगर २६ जानेवारी, संक्रांत, रक्षाबंधन, गणेशोत्सव असो अगर दिवाळी ... सण कोणताही असूदेत रस्त्यावर मांडव टाकून दुकान मांडण्याची नफेखोरवृत्ती बाजारपेठेमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. सण आहे म्हणून रस्त्यात पडलेल्या मांडवाकडे दुर्लक्ष करणारे प्रशासन वाहतुकीची शिस्त पाळत आहे की, पादचारी अथवा दुकानदारांचे हित साधत आहेत? असा प्रश्‍न संवेदनशील सातारकरांना प्रकर्षाने सतावतोय. अतिक्रमणांवर कारवाई करण्याची जबाबदारी असलेली नगरपालिका आणि रहदारीतील अडथळे दूर करण्याचे कर्तव्य असलेले स्थानिक पोलिस ठाणे नेमकं करतं काय? असा प्रश्‍न आहे.

देश स्वतंत्र झाला. लोकांनी त्या प्रीत्यर्थ रस्त्यावर जिलेबी वाटून आपला आनंद साजरा केला. स्वातंत्र्यदिनानंतर गणतंत्रदिनीही हीच प्रथा पुढे रुढ झाली. दुकानाबाहेर मांडव घालून, सडा-रांगोळी घालून, मंगल धून वाजवून जिलेबी वाटली जाऊ लागली. या दोन्ही दिवशी जिलेबी वाटून आनंद साजरा करण्याची परंपरा आजही साताऱ्यात पाळली जाते.

त्यात फरक फक्त एवढाच पडला की, पूर्वी जिलेबी मोफत वाटली जायची. आता दुकानदार दुकाने थाटून जिलेबीची विक्री करतात. सांगायचा मुद्दा हा की, व्यापारी वृत्ती रस्त्यावर येण्याचे निमित्त शोधत असतात. स्वत:चे दुकान असताना, डोक्‍यावर छत, किमती फर्निचर असताना ते सोडून दुकानदार का बरं रस्त्यात दुकान मांडून बसत असतील. केवळ १५ ऑगस्ट, २६ जानेवारीच नाही, इतर सणासुदीच्या निमित्ताने आठ दिवस आधी रस्त्यात दुकान मांडले जाते. 

‘दुकानात जे खपत नाही, ते रस्त्यावर खपतं’ ही मानसिकता बदलावी लागेल. रस्त्यावर केवळ साहित्य विक्रीच होत नाही तर चक्क खाद्यपदार्थ रस्त्यावर विकले जातात. वाहनांतून बाहेर पडणारा कार्बन, धुलीकन, माशांचा प्रादुर्भाव, त्यातून निर्माण होणारे आजार व साथरोग याचा विचार त्याठिकाणी ग्राहक म्हणून जाणारे शिकलेसवरलेले लोकही करत नाहीत. 

आपल्याकडे तिन्ही त्रिकाळ विविध सण आणि उत्सवांची मांदियाळी असते. कोणकोणत्या सणाला रस्त्यावर दुकान मांडणाऱ्यांना सवलत देणार, असा प्रश्‍न आहे. वाहनांची संख्या वाढतेय, रस्ते अपुरे पडतात, पार्किंगला जागा मिळेना. वाहतूक कोंडीचा प्रश्‍न जटिल होत चाललाय. अशा परिस्थितीत रस्ते रुंद करण्याऐवजी, त्यात मांडव घालून आणखी अडचणीत भर घालायला प्रशासन परवानगी देते कशी, असा प्रश्‍न संवेदनशील सातारकरांना पडतो. कुठं पाणी मुरतंय हे स्पष्ट आहे. आजाराच्या मुळावर उपचार व्हायला पाहिजेत, हे मात्र नक्की !