दारूबंदी, विकासकामांवरून दणाणल्या ग्रामसभा

दारूबंदी, विकासकामांवरून दणाणल्या ग्रामसभा

सातारा - स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेण्यात आल्या. सध्या दारूबंदीसाठी महिलांनी रान उठविले असल्यामुळे त्याचे पडसाद ग्रामसभांमध्येही उमटले. अनेक ठिकाणी सध्याची दुकाने बंद करा, तर काही ठिकाणी नवीन दुकानांना परवाना नको, या मागण्यांनी जोर धरला. विकासकामांवरून सत्ताधारी-विरोधकांत खडाजंगी झाल्यामुळे अनेक ग्रामसभा दणाणून गेल्या. मात्र, १०७ ग्रामसभांची गणपूर्ती न झाल्यामुळे त्या तहकूब झाल्या. 

जिल्ह्यातील एक हजार ४९४ ग्रामपंचायतींमध्ये स्वातंत्र्यदिनाची ग्रामसभा घेण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. त्यानुसार सर्वच ग्रामपंचायतींनी कार्यवाही केली. ग्रामीण भागातील घरांच्या नोंदी पती- पत्नीच्या संयुक्‍त नावे करण्याबाबत राज्य शासनाने २००३ मध्ये परिपत्रक काढूनही त्यावर पूर्णत: कार्यवाही झालेली नव्हती. त्याला मूर्तस्वरूप देण्यासाठी जिल्हा परिषदेने हा विषय ‘अजेंड्या’वर घेत ग्रामसभांपासून ही कार्यवाही सुरू करण्यात आली. त्यादृष्टीने मिळकतींची संख्या, पती-पत्नीच्या संयुक्‍त नावे असलेली मिळकतींची संख्या, नसलेल्या मिळकतींची संख्या तपासून घेण्यात आली. तसेच गणेशमूर्ती, निर्माल्याचे जलस्त्रोतांमध्ये विसर्जन केल्यामुळे पाण्याचे प्रदूषण वाढत आहे. ते टाळण्यासाठी प्रयत्न करण्याचा, यासह विविध १२ विषयांवर प्रामुख्याने कालच्या ग्रामसभांमध्ये चर्चा होऊन विविध ठराव झाले. 

ग्रामसभांमध्ये चौदाव्या वित्त आयोगातील निधी, ‘आमचं गाव, आमचा विकास’ आराखडा याचा आढावा सर्व ग्रामपंचायतींत घेण्यात आला. यामध्ये बहुतांश ठिकाणी विकासकामांवर सत्ताधारी, विरोधकांमध्ये खडाजंगीही झाल्या. काही ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका लवकरच होणार असल्याने तेथे चांगलेच रण तापले. अनेक गावांमध्ये दारूबंदीसाठी महिलांनी पुढाकार घेतला असल्यामुळे तेथे दारूबंदी करावी, तसेच नव्याने दारूविक्री दुकानांना परवानगी देऊ नये, अशीही महिलांनी मागणी केली. 

जिल्ह्यातील ग्रामपंचायती व झालेल्या ग्रामसभा
तालुका........ग्रामपंचायती........ग्रामसभा
सातारा............१९४............१७०
कोरेगाव............१४१............१४१
खटाव............१३३............१३०
माण............९५............९५
फलटण............१२८............१०५
खंडाळा............६३............४५
वाई.................९९............९६
जावळी............१२५............१०७
महाबळेश्‍वर........७९.............७७
कऱ्हाड............१९९............१८३
पाटण............२३८............२३८
एकूण............१४९४............१३८७

ग्रामसभांत...
२४ तास पाण्याची मागणी
दारू दुकानांना परवाना नको
सत्ताधारी-विरोधकांत खडाजंगी
उत्पन्नवाढीसाठी पर्यायांची मागणी
निर्माल्याच्या विल्हेवाटीचा निर्णय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com