‘ति’च्या वेदना दूर करण्यासाठी...

श्रीकांत कात्रे
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

नवरात्र संपले. दसरा उजाडला. सीमोल्लंघनाची वेळ आली. देवीच्या रूपातील स्त्री शक्तीचा सन्मान करण्याची परंपरा महिला सबलीकरणाला ताकद देणारी असावी, अशा स्वरूपाचे उपक्रम राबविले जातात. जगभरात महिलांना प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न होत आहेत. याच नवरात्राच्या काळात मुलीला सन्मान देण्याचे सोडाच; परंतु तिचा मानसिक छळ करून त्रास देण्याचा संतापजनक प्रकार कऱ्हाडमधील एका खासगी शाळेत घडला. मुख्य म्हणजे या वेदनादायी घटनेत त्रास देणारी व्यक्तीही महिलाच आहे. स्त्रीला कमी लेखून तिला सतत दडपणाखाली ठेवण्याची समाजाची मानसिकता अजूनही कायम आहे, हाच या घटनेचा अर्थ आहे.

नवरात्र संपले. दसरा उजाडला. सीमोल्लंघनाची वेळ आली. देवीच्या रूपातील स्त्री शक्तीचा सन्मान करण्याची परंपरा महिला सबलीकरणाला ताकद देणारी असावी, अशा स्वरूपाचे उपक्रम राबविले जातात. जगभरात महिलांना प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न होत आहेत. याच नवरात्राच्या काळात मुलीला सन्मान देण्याचे सोडाच; परंतु तिचा मानसिक छळ करून त्रास देण्याचा संतापजनक प्रकार कऱ्हाडमधील एका खासगी शाळेत घडला. मुख्य म्हणजे या वेदनादायी घटनेत त्रास देणारी व्यक्तीही महिलाच आहे. स्त्रीला कमी लेखून तिला सतत दडपणाखाली ठेवण्याची समाजाची मानसिकता अजूनही कायम आहे, हाच या घटनेचा अर्थ आहे. सातत्याने स्त्रियांच्या विरोधात वर्तन करून तिचे खच्चीकरण करण्याच्या प्रवृत्तीला ठेचून काढण्याशिवाय पर्याय नाही.

कऱ्हाडमधील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हा लाजीरवाणा प्रकार घडला. आठवीमध्ये शिकणाऱ्या मुलीला या प्रसंगाला सामोरे जावे लागले. बाथरूममध्ये सॅनिटरी पॅड टाकल्याचा आरोप शाळेच्या उपप्राचार्यपदाची जबाबदारी पेलणाऱ्या महिलेने या मुलीवर केला. ही मुलगी आरोप नाकारत आपण पॅड टाकला नाही, असे सांगत असतानाही, तिला अपमानस्पद वागणूक देत तीन तास केबीनमध्ये उभे करण्याची शिक्षा देण्यात आली. तिच्या डोळ्यांत पाणी साठले असले, तरी त्या महिलेला पाझर फुटला नाही. उलट सहकारी शिक्षकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने त्या मुलीने गुन्हा कबूल करावा, म्हणून तिच्यावर दबाव टाकला जात होता. प्रतिष्ठित म्हणून समाजात मिरवण्याची खुमखुमी असणाऱ्या शाळेतील हा प्रकार फक्त शाळेचीच नव्हे, तर समाजाची मान खाली जावी, इतका घृणास्पद आहे. या वयोगटातील मुलींना त्यांच्यातील नैसर्गिक बदलांविषयी माहिती देऊन त्यांना मानसिक आधार देण्याची गरज असते. या वयोगटातील प्रसंग मनावर कायमचे कोरले जातात. मुलींना मानसिकदृष्ट्या सक्षम करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. उपप्राचार्यपदाची जबाबदारी सांभाळणारी स्त्रीच अशी बेजबाबदार वर्तन करत असेल, तर ते केवळ अक्षम्य आहे.      

महिला कितीही कर्तृत्ववान झाली, तरी ती शेवटी महिलाच आहे, हा दृष्टिकोन बदलला पाहिजे, हे सातत्याने सांगितले जाते. ती एक माणूस आहे, म्हणून तिला सन्मान द्यायला हवा. माणूस म्हणून जगण्यासाठी तिची वाढ होत असतानाच तिला अशा प्रसंगांना सामोरे जावे लागणे वेदनादायी आहे. पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा स्त्रीवरही असतो, हे या प्रकाराने सिद्ध केले आहे.

इंग्रजी माध्यमांच्या अनेक शाळांमध्ये चांगले उपक्रम असू शकतातही; परंतु शिस्तीच्या नावाखाली काही शाळांतून अशी संस्कृती फोफावण्याचे प्रकारही समोर येतात. त्या वेळी आपण कोणत्या प्रकारचे शिक्षण पाल्यांना देतो, याचा विचार करण्याचीही जाणीव या प्रसंगाने करून दिली आहे. मुलीला समजावून सांगत शिस्तीचे पालन करता येऊ शकते. शिस्तीसाठी शिक्षा आणि तीही या प्रकारे दिली जात असेल, तर त्याचे गांभीर्य मोठे आहे. हे गांभीर्य अशा संस्थांच्या चालकांना कळत नसेल, तर शिक्षणाच्या बाजारीकरणाला हातभार लावण्यापलीकडे ते काही करू शकत नाहीत, असेच म्हणावे लागेल. जगाच्या स्पर्धेत टिकण्याचे शिक्षण देण्याबरोबरच माणूस म्हणून जगण्याचा आनंद मिळविता येईल, असे शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. या प्रकाराची तक्रार कऱ्हाड पोलिस ठाण्यात झाली आहे.

पोलिसांनी योग्य प्रकारे कारवाई करणे अपेक्षित आहे. तिथेही पुन्हा स्त्रियांबाबतच्या दृष्टिकोनाचा धोका आहेच. मुलीपेक्षा शाळेची श्रीमंती महत्त्वाची वाटली, तर कारवाईत अडथळा येऊ शकतो. अशा वेळी मात्र, साऱ्या समाजाने या मुलीच्या आणि अर्थातच स्त्रीच्या ‘माणूस’ म्हणून जगण्याच्या हक्कांसाठी तिच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. अशा प्रवृत्तींना खतपाणी घालणाऱ्या शाळांनाच धडा शिकवला पाहिजे. वाईट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी चांगल्या गोष्टी घडवून आणणे, म्हणजेच सीमोल्लंघन. महिलांचे खच्चीकरण करणाऱ्या प्रवृत्तींवर आसूड ओढत मानसिकता बदलण्यासाठीच सजग राहावे लागेल. ‘ति’ला ‘माणूस’ म्हणून जगण्याचा आनंद मिळवून देण्यासाठी या प्रवृत्तींना वेसण घालायला हवी.

Web Title: satara news women dasara