मुलींना मिळणार महिला पोलिसांचा मोबाईल नंबर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

जिल्हा पोलिस अधीक्षकांची योजना; तनिष्कांच्या वतीने कन्याशाळेत स्वसंरक्षणाचे धडे  
सातारा - मदतीची हाक दिल्यावर धावून जातील, अशा महिला पोलिसांचे मोबाईल नंबर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थिनींना देण्याची नवी योजना सुरू करणार असल्याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले. तनिष्का व्यासपीठाने महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी उचलेले स्वसंरक्षणाच्या शिक्षणाचे पाऊलही महत्त्वाचे आहे. या दोन्ही उपक्रमांतून विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्‍वास व सुरक्षिततेची भावना वाढेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.   

जिल्हा पोलिस अधीक्षकांची योजना; तनिष्कांच्या वतीने कन्याशाळेत स्वसंरक्षणाचे धडे  
सातारा - मदतीची हाक दिल्यावर धावून जातील, अशा महिला पोलिसांचे मोबाईल नंबर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थिनींना देण्याची नवी योजना सुरू करणार असल्याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले. तनिष्का व्यासपीठाने महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी उचलेले स्वसंरक्षणाच्या शिक्षणाचे पाऊलही महत्त्वाचे आहे. या दोन्ही उपक्रमांतून विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्‍वास व सुरक्षिततेची भावना वाढेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.   

तनिष्का व्यासपीठाच्या वतीने महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या येथील कन्याशाळेत विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याच्या कार्यक्रमाचा आज प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अजित कुबेर होते. मुख्याध्यापिका रुक्‍मिणी भोये, पर्यवेक्षिका भारती झिंब्रे, ‘सकाळ’चे सहयोगी संपादक श्रीकांत कात्रे, शाखा व्यवस्थापक राजेश निंबाळकर, मुख्य उपसंपादक संजय शिंदे उपस्थित होते. 

सुरक्षेच्या दृष्टीने मुलींमध्ये आत्मविश्‍वास निर्माण होण्यासाठी याच कार्यक्रमात मला एक कल्पना सुचली, असे नमूद करून श्री. पाटील म्हणाले, ‘‘पोलिस दलांत महिला पोलिसांची संख्या ३० टक्के आहे. शाळांतील मुलींजवळ त्या-त्या परिसरातील महिला पोलिसांचा मोबाईल नंबर असेल तर आपल्याजवळ महिला पोलिसाचा नंबर आहे, या जाणीवेतून ती कोणत्याही प्रसंगाला समर्थपणे तोंड देऊ शकेल.’’ सोशल मीडियाच्या भुलभुलैय्याला फसू नका. तुमचा मोठा भाऊ म्हणून तुम्हाला सांगत आहे, असे भावनिक आवाहन करत श्री. पाटील यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘महिला व मुलींवरील अन्यायाला आळा घालण्याच्या उद्देशाने तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणामुळे मुलींना समाजात निर्भयपणे वावरण्याचा आत्मविश्‍वास वाढेल. त्यांचा दृष्टिकोनही निश्‍चित बदलेल. लोकांच्या सेवेसाठी पोलिस असून, त्यांचा व जनतेत संवादासाठी विविध उपक्रम राबविले जातात.’’

श्री. कात्रे म्हणाले, ‘‘महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी तनिष्का व्यासपीठाच्या वतीने जिल्ह्यात विविध उपक्रम होतात. त्याचाच एक भाग म्हणून शालेय मुलींना स्वसंरक्षणाच्या काही नेमक्‍या युक्ती सांगणारा कार्यक्रम शालेय मुलींसमोर राबविण्याचे ठरविले. या कार्यक्रमापासून जिल्ह्यातील विविध शाळांत स्थानिक तनिष्का गटांच्या मदतीने हा उपक्रम राबविला जाईल.’’ महिला, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी तनिष्का व्यासपीठाने राबविलेल्या उपक्रमाचे मोल मोठे आहे. अशा उपक्रमांची सध्याच्या काळात फार आवश्‍यकता आहे, असे श्री. कुबेर यांनी सांगितले.

तनिष्का व चॅंपियन्स कराटे क्‍लबच्या प्रशिक्षिका तमन्ना रिनवा व निकिता सोनकट्याळे यांनी विद्यार्थिनींना प्रात्यक्षिके सादर करून दाखवत विविध प्रसंगांतून आपला बचाव कसा करायचा, याच्या टीप्स दिल्या. निशा जाधव यांनी स्वागत व पाहुण्यांचा परिचय करून दिला. अविनाश मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. संजय शिंदे यांनी आभार मानले.

कन्याशाळेच्या विद्यार्थिनींच्या नादाला कोणी लागू नये, असे प्रशिक्षण व स्वसंरक्षणाच्या टिप्स तुम्हाला तनिष्काच्या माध्यमातून मिळतील, अशी आशा आहे.
- संदीप पाटील, पोलिस अधीक्षक 

पोलिस अधीक्षकांनी दिले एक हजार रुपयांचे बक्षीस
महिलांच्या समस्येचे मूळ कारण काय, असा प्रश्‍न पोलिस अधीक्षक पाटील यांनी विद्यार्थिनींना विचारला. त्यावर संजना सावंत या विद्यार्थिनीने महिला स्वावलंबी नसल्यामुळे समस्या वाढतात, असे उत्तर दिले. त्यावर श्री. पाटील यांनी तिला एक हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविले. 

Web Title: satara news women police number gives to girls