सव्वादोन लाख महिला झाल्या स्वावलंबी

विशाल पाटील
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

सातारा - महागाईच्या काळात निवांत राहणे, हे कोणत्याच महिलांना, कुटुंबाला परवडणारे नाही. कुटुंब चालवायचे, तर दोन पैसे मिळाले पाहिजेत. त्यासाठी सर्वांना नोकऱ्या मिळतीलच असे नाही. अनेक महिलांना लहान स्वरूपातील व्यवसाय सुरू करायचा असतो, अशा महिलांसाठी शासनाने पुढे येत ग्रामीण जीवनोन्नती अभियान सुरू केले. त्यातून जिल्ह्यातील तब्बल दोन लाख २१ हजार महिलांना व्यवसाय, रोजगारासाठी आर्थिक मदत होत आहे. 

सातारा - महागाईच्या काळात निवांत राहणे, हे कोणत्याच महिलांना, कुटुंबाला परवडणारे नाही. कुटुंब चालवायचे, तर दोन पैसे मिळाले पाहिजेत. त्यासाठी सर्वांना नोकऱ्या मिळतीलच असे नाही. अनेक महिलांना लहान स्वरूपातील व्यवसाय सुरू करायचा असतो, अशा महिलांसाठी शासनाने पुढे येत ग्रामीण जीवनोन्नती अभियान सुरू केले. त्यातून जिल्ह्यातील तब्बल दोन लाख २१ हजार महिलांना व्यवसाय, रोजगारासाठी आर्थिक मदत होत आहे. 

ग्रामीण भागामध्ये बचत गटांची चळवळ झपाट्याने रुजली. अनेक वर्षांपासून शासनाने महिलांना आर्थिक मदत करून, त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी उचललेले हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरले. या योजनेतून वर्षानुवर्षे महिलांना रोजगार निर्मितीसाठी शासन मदत करत आहे. त्यातून अनेक महिलांनी व्यवसायातही आपला ठसा उमटविला आहे. जिल्ह्यात तब्बल चार हजार ५६१ क्रियाशील बचत गट आहेत. या गटांना प्रोत्साहन देण्यासाठी शासकीय पातळीवर बाजारपेठ मिळवून देण्यासाठीही जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. मानिनी जत्रेत तब्बल २०० गट, तर महालक्ष्मी सरस प्रदर्शनात १८ हून अधिक गट सहभागी होतात. त्यात कोणी कुटीर उद्योग, दुग्ध व्यवसाय, पशुपालन, कुक्‍कुटपालन यांसह सुशोभित वस्तू बनविणे, मातीची भांडी, पिशवी, खाद्यपदार्थ आदी व्यवसाय सुरू केले. काही बचत गट हंगामी व्यवसाय करत आहेत. त्यामुळे अनेक महिलांच्या कुटुंबात आर्थिक समृद्धता नांदू लागली आहे. 

केंद्र सरकार दीनदयाळ अंत्योदय योजना, तर राज्य सरकार महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला समूहांना (बचत गट) फिरता निधी, कर्ज अशा स्वरूपात मदत मिळत आहे. फिरत्या निधीतून १५ हजार, तर कर्ज स्वरूपात एक लाख रुपये दिले जात आहेत. यापूर्वी ५० हजार रुपये दिले जात होते. रिझर्व्ह बॅंकेने एक जुलै २०१७ ला मार्गदर्शक सूचना काढल्या असून त्यानुसार ही रक्‍कम लाखावर नेली आहे. या कर्जातील काही टक्‍के व्याज सरकार भरते. त्यामुळे महिलांना थेट आर्थिक लाभ होतो. शिवाय, शासनाने सदस्य महिलांची स्वतंत्र खाती काढली असून, त्याला आधार कार्ड लिंक केले आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ थेट खात्यावर होऊ लागला आहे. 

जिल्ह्यातील ५४७ गटांना साडेदहा कोटींचे कर्जवाटप
जिल्ह्यातील ८४७ बचत गटांना फिरता निधी वाटपाचे लक्ष्य असून आजपर्यंत २३७ गटांना वाटप झाले आहे. आठ हजार २८६ गटांना एक लाख रुपये कर्ज देण्याचे उद्दिष्ट असून, त्यापैकी ५४७ गटांना दहा कोटी ५० लाख रुपये कर्जाचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागातून देण्यात आली.

आकडे बोलतात...
बचत गट :    १७,१५६
सदस्य :    २,२१,९११
क्रियाशील गट :    ४,५६१