सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कैलास शिंदे

विशाल पाटील
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

डॉ. राजेश देशमुख यांनी यवतमाळ जिल्हाधिकारीपदी बदली

सातारा : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्यमंत्री कक्षातील उपसचिव कैलास शिंदे यांच्या नियुक्तीचे आदेश आज निघाले. सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. राजेश देशमुख यांची यवतमाळ जिल्हाधिकारीपदी बदली झाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील उपसचिव कैलास शिंदे यांची नुकतीच महसूल व्यतिरिक्त खात्यातून नुकतीच आय.ए.एस म्हणून पदोन्नती झाली होती. त्यांनी मंत्रालयातून डेस्क ऑफिसर या पदापासून शासकीय सेवाला प्रारंभ केला. त्यानंतर उपसचिव व आता 'सीईओ' पदापर्यंत मजल मारली. ते प्रशिक्षण पूर्ण करून लवकरच कार्यभार स्वीकारतील.

डॉ. देशमुख यांनी एमपीएससी परीक्षेत राज्यात द्वितीय क्रमांक मिळवून उपजिल्हाधिकारी पदापासून शासकीय सेवेला प्रारंभ केला. डॉ. देशमुख हे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे स्वीय सहायक होते. त्यावेळी त्यांना आय.ए.एस. म्हणून पदोन्नती मिळाली. त्यानंतर त्यांना सातारा जिल्हा परिषदेच्या 'सीईओ' पदाची जबाबदारी मिळाली. हा कार्यभार हाती घेतल्यानंतर त्यांनी सामूहिक काम करत जिल्हा परिषदेचा नावलौकिक उंचावला.
स्वच्छ भारत अभियान, पंतप्रधान आवास योजना यासह विविध योजनांमध्ये प्रभावीपणे काम करत देश, राज्य पातळीवर अनेक पुरस्कार मिळवले. या कामाची दखल घेत शासनाने त्यांच्यावर यवतमाळ जिल्हाधिकारी पदाची जबादारी दिली. अवघ्या 14 महिन्यांत त्यांनी जिल्हा परिषदेला देश पातळीवर लौकिक मिळवून देणारा कारभार केला.