शौचालय बांधणीमध्ये ‘झेडपी’ची गरुड भरारी

शौचालय बांधणीमध्ये ‘झेडपी’ची गरुड भरारी

सातारा - स्वच्छ भारत अभियानात (ग्रामीण) सातारा जिल्हा परिषदेने गरूड भरारी घेतल्याने देशात तिसरा क्रमांक मिळविला, तसेच प्रमाणित करण्यात (ओडीएफ) राज्यात प्रथम येण्याची कामगिरी केली. जिल्ह्यातील चार लाख ७१ हजार २२८ कुटुंबांपैकी चार लाख ५४ हजार २९५ कुटुंबांत वैयक्‍तिक शौचालये आहेत. शिवाय, सध्या १६ हजार ९३३ कुटुंबांत शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट असून, त्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.

केंद्र, राज्य शासनाच्या विविध योजनांमध्ये सातारा जिल्हा परिषदेने देशात, राज्यात अनेकदा डंका वाजविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या स्वच्छ भारत अभियानातही सातारा जिल्ह्यातील अभिमानास्पद कामगिरी केली आहे. निर्मल भारत अभियान सुरू असताना २०१२-१३ मध्ये जिल्ह्यात शौचालयांबाबत सर्वेक्षण झाले होते. त्या वेळी तीन लाख ४३ हजार ५७० कुटुंबांत शौचालये होती, तर एक लाख २७ हजार ६५८ कुटुंबांकडे शौचालये उपलब्ध नव्हती. या दरम्यानच्या काळात अनेक कुटुंबे विभक्‍त झाल्याने शौचालये नसल्याने कुटुंबांची संख्याही वाढली होती. 

स्वच्छ भारत अभियान सुरू झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाने  कंबर कसत शौचालये बांधण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी जिल्हाभरात लोकसहभाग, लोकप्रतिनिधींचे सहकार्यही मिळाले. त्यातून एक लाख दहा हजार ७२५ कुटुंबांत वैयक्‍तिक  शौचालये बांधण्यात आली. मागील एक वर्षात तब्बल ५१ हजार ९४७ शौचालये  बांधली गेली. त्यामुळे आता १६ हजार ९३३ शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट 
आहे. ते मार्चपर्यंत पूर्ण करणार असल्याचा विश्‍वास मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी व्यक्‍त केला. 

असे मिळाले अनुदान
स्वच्छ भारत अभियानात शौचालय बांधण्यासाठी प्रत्येक १२ हजार रुपयांचे अनुदान दिले जात आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यात २०१५-१६ मध्ये १७ कोटी तीन लाख, २०१६-१७ मध्ये २७ कोटी ४५ लाख, २०१७-१८ मध्ये दोन कोटी ४९ लाखांचे अनुदान देण्यात आले आहे. ते थेट संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com