सातारा पोलिसांचे मटका अड्ड्यांवर छापे 

सातारा पोलिसांचे मटका अड्ड्यांवर छापे 

सातारा - उपअधीक्षक गजानन राजमाने यांनी काल शहर परिसरातील मटका अड्ड्यांविरोधात धडक कारवाई करत तब्बल 37 जणांना अटक केली. त्यामध्ये दोन तडीपारांचाही समावेश आहे. त्यांच्याकडून रक्कम व जुगाराचे साहित्य असा सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही तासांतच ही कारवाई करण्यात आली. 

अधीक्षक देशमुख यांनी काल सायंकाळी पदभार स्वीकरला. त्यानंतर सायंकाळी उपअधीक्षक गजानन राजमाने त्यांची भेट घेण्यासाठी पोलिस मुख्यालयात आले होते. अधीक्षकांची भेट झाल्यानंतर त्यांनी शहरातील अवैध धंद्याविरोधात जोरदार मोहीम उघडली. राजवाडा येथील बस स्टॉपजवळ मटका अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी सायंकाळी त्याठिकाणी छापा टाकण्यात आला. तेथे अनिकेत सतीश चोरगे, पापा गेणू गवळी, दीपक मारुती पवार, राजेश रामचंद्र कोळेकर, सचिन प्रल्हाद सुपेकर, उदय लक्ष्मण आमणे, भानुदास मोतीराम देशमुख, रवी पांडुरंग विचारे, अक्षय सुरेश क्षीरसागर, सागर अशोक बोभाटे, प्रताप बबन सकटे, भगवान कृष्णा गायकवाड (सर्व रा. मंगळवार पेठ, सातारा) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 42 हजार रुपये व सात मोबाईल असा ऐवज जप्त करण्यात आला. बऱ्याच दिवसांपासून याठिकाणी हा मटक्‍याचा अड्डा सुरू होता. 

राजवाड्यावरील अड्ड्यावर पकडलेल्या संशयितांकडे उपअधीक्षक राजमाने व त्यांच्या पथकाने कसून चौकशी केली. त्या वेळी सैदापूर येथील एका बंगल्यातून समीर कच्छी मोबाईलवरून मटका अड्डे चालवत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने दुसरी धडक कारवाई करत सैदापूर (ता. सातारा) येथील सराईत मटका व्यावसायिक समीर सलीम कच्छी याच्या घरावर छापा टाकला. हा बंगला बंद होता. आवाज देऊनही कोणीही प्रतिसाद देत नव्हते. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या पत्नीच्या समक्ष बंगल्याचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर प्रिंटर व मटक्‍याचे साहित्य, टीव्ही व कॅलक्‍युटर असे साहित्य आढळून आले. तिसऱ्या मजल्यावरील जिममध्ये संशयित लपून बसल्याचे पोलिसांना आढळले. तेथून प्रभाकर बलदेव मिश्रा, वसीम इब्राहिम शेख, दिलीपकुमार त्र्यंबक नाफड, राहुल रामदास पंडित, रामदास काशिनाथ पंडित, क्षितीज मधुकर साठे, संतोष परशुराम जगताप, नजीद हनिफ पटवेकर, सागर शाम महामुनी, समीर महंमद पठाण, राजेश संपतराव कदम, मोहसिन रफिक पटवेकर, भरत बाबा वाघमारे, चयशस धनश्‍याम काटकर, सौरस संजय जाधव, मुक्तार अब्दुल शेख, किरण शंकर माने, विजय महादेव कांबळे, चंद्रमनी धनंजय आगाने, नारायण जनार्दन गाकवाड, दादा सुरेश भिंताडे, संतोष जिजाबा साळुंखे (सर्व रा. सातारा शहर परिसर) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून रक्कम, जुगाराचे साहित्य तसेच टीव्ही 

असा सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. जुगाराच्या गुन्ह्याबरोबरच प्रभाकर मिश्रा (रा. औद्योगिक वसाहत) व वसील शेख (रा. रविवार पेठ) यांच्यावर तडीपारी आदेशाचा भंग केल्याचा गुन्हाही नोंदविण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com