‘प्रगत शैक्षणिक’मध्ये सातारा द्वितीय

‘प्रगत शैक्षणिक’मध्ये सातारा द्वितीय

सिंधुदुर्ग प्रथम; जावळी, वाई, पाटण, कऱ्हाड, खटाव चमकले 
सातारा - प्रत्येक मूल शिकले पाहिजे, यासाठी शिक्षण संचालनालयाच्या निर्देशाप्रमाणे ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ उपक्रम राज्यभरात राबविण्यात आला. त्यातील भाषा व गणित विषयांसाठी झालेल्या पायाभूत चाचणी व संकलित मूल्यमापन चाचणी एकचे विश्‍लेषण नुकतेच विद्या प्राधिकरणाने जाहीर केले. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम, सातारा द्वितीय, तर रत्नागिरी जिल्ह्याने तृतीय क्रमांक मिळविला. 

पहिली ते आठवीतील प्रत्येक विद्यार्थ्याच्या भाषा व गणित विषयातील गुणवत्तेची नियमित पडताळणी करण्यासाठी शिक्षण विभागाने चालू शैक्षणिक वर्षापासून ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ उपक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे. राज्यातील सर्व माध्यमांच्या मान्यताप्राप्त शाळांतील पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी चाचण्यांचे आयोजन करण्यात आले. राज्यातील एक कोटी ६० लाख विद्यार्थ्यांची वर्षभरात तीन वेळा शैक्षणिक प्रगती चाचणी, पायाभूत चाचणी व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनातील संकलित मूल्यमापनाच्या दोन चाचण्या घेण्यात आल्या. त्यातील पायाभूत चाचणी व संकलित चाचणी एकचे भाषा व गणित विषयांतील गुण शाळांनी ‘सरल’ प्रणालीत भरले होते. त्याअनुषंगाने विद्या परिषदेने त्याचे निष्कर्ष नुकतेच जाहीर केले. 

भाषा विषयात सिंधुदुर्ग, सातारा, रत्नागिरी, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यास, तर गणित विषयात सिंधुदुर्ग, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यास अनुक्रमे प्रथम पाच क्रमांकाचे गुण मिळाले. भाषा व गणित विषयांत सर्वांत कमी नंदुरबारला गुण मिळाले आहेत. पायाभूत चाचणीत भाषा विषयात उच्चतम गुण संपादन करणाऱ्या २० तालुक्‍यांत वाई तालुक्‍याने द्वितीय, जावळीने दहावा क्रमांक मिळविला. गणित विषयात वाईने प्रथम, जावळीने तृतीय क्रमांक मिळविला.  

संकलित मूल्यमापन चाचणीच्या भाषा विषयात वाईने प्रथम, जावळीने सहावा, कऱ्हाडने १५ वा, खटावने १८ वा क्रमांक मिळविला. भाषा विषयात वाई प्रथम, गणित विषयात जावळीने प्रथम, वाईने द्वितीय, पाटणने १६ वा, खटाव तालुक्‍याने १७ वा क्रमांक मिळविला. पायाभूत चाचणीतील भाषा विषयात केडंबे (जावळी), ताईगडेवाडी, दिवशी बुद्रुक (पाटण), भुईंज (वाई) या, तर गणित विषयात केडंबे, किकली, बोपर्डी (वाई), खर्शी बारामुरे (जावळी), एकसर (वाई), ललगुण (खटाव) या केंद्रांनी यश मिळविले.

संकलित मूल्यपानातील भाषा विषयात दिवशी बुद्रुक, केडंबे, बोंबले (खटाव), भुईंज, ताईगडेवाडी या केंद्रांनी, तर गणित विषयात केडंबे, खर्शी बारामुरे, किकली, दिवशी बुद्रुक, मेंढोशी, केरळ (पाटण), एकसर, बोपर्डी (वाई), भणंग (जावळी), दरे बुद्रुक (सातारा) या केंद्रांनी यश मिळविले.

सहा तालुके का मागे?
कुमठे (ता. सातारा) बिटाने ज्ञानरचनावाद पद्धतीत देशात नावलौकिक मिळविला आहे. मात्र, या कार्यक्रमात कोठेही कुमठे अथवा सातारा तालुक्‍यातील बिटांनी चमकदार कामगिरी केली नाही. त्यामुळे नेमके प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान चुकीचे आहे, की ज्ञानरचनावाद? असा सूरही शिक्षण क्षेत्रात उमटत आहे. साताऱ्यासह फलटण, महाबळेश्‍वर, माण, खंडाळा, कोरेगाव तालुक्‍यांतील एकाही केंद्राने राज्यस्तरावर यश मिळविले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com