जिल्ह्यात बंधूप्रेम उफाळले 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

सातारा - जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात बंधूप्रेम उफाळून आले आहे. एक भाऊ दुसऱ्याच्या विरोधात, तर काही ठिकाणी भावाला निवडून आणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या "वेटिंग लिस्ट'मध्ये ठेवण्यासाठी ही भाऊबंदकी पेटलेली दिसत आहे. त्यात सातारा, माण, फलटण, जावळी, खटाव, कऱ्हाड, पाटण या तालुक्‍यांचा समावेश आहे. 

सातारा - जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात बंधूप्रेम उफाळून आले आहे. एक भाऊ दुसऱ्याच्या विरोधात, तर काही ठिकाणी भावाला निवडून आणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या "वेटिंग लिस्ट'मध्ये ठेवण्यासाठी ही भाऊबंदकी पेटलेली दिसत आहे. त्यात सातारा, माण, फलटण, जावळी, खटाव, कऱ्हाड, पाटण या तालुक्‍यांचा समावेश आहे. 

जिल्हा परिषद निवडणुकीचा फड चांगलाच पेटलेला आहे. या वेळेस निवडणुकीचे वेगळेपण म्हणजे प्रत्येक तालुक्‍यामध्ये बंधूप्रेम आणि भाऊबंदकीचे राजकारण टोकला गेले आहे. यात एक भाऊ दुसऱ्या भावाच्या विरोधात तर काही ठिकाणी एक भाऊ दुसऱ्या भावाला निवडून आणून त्याला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळेल, या आशेवर कामाला लागले आहेत. 

राजघराण्यामध्ये शीतयुद्ध 

सातारा तालुक्‍यात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. एकीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधे असूनही उदयनराजेंनी आपला सवतासुभा मांडत सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून भाजप आणि कॉंग्रेसच्या मदतीने साताऱ्यातील दहा गट व 20 गणांवर कब्जा मिळविण्याची तयारी केली आहे. खासदारांच्या या रणनीतीला छेद देऊन पुन्हा पंचायत समिती व जिल्हा परिषदेत आपलीच सत्ता कायम ठेवण्यासाठी शिवेंद्रसिंहराजेंनी छुपी रणनीती आजमावली आहे. त्यामुळे या दोघा भावांत भाऊबंदकीचे राजकारण रंगले आहे. 

गोरे, गुदगे बंधूंत संघर्ष 

माण तालुक्‍यात कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शेखर गोरे यांच्यात सत्तासंघर्ष पेटला आहे. येथे दोन्ही गोरे बंधू एकमेकाला राजकारणातून हद्दपारीचे राजकारण करू लागले आहेत. तर खटाव तालुक्‍यात (कै.) भाऊसाहेब गुदगे यांचे दोन चिरंजीव मायणी बॅंकेचे अध्यक्ष सुरेंद्र गुदगे आणि सचिन गुदगे हे एकमेकांविरोधात उतरले आहेत. सचिन गुदगे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून सुरेंद्र गुदगे यांनी आजपर्यंत केलेल्या कुटनीतीचा पाढा वाचायला सुरवात केली आहे. त्यासाठी त्यांना डॉ. दिलीप येळगावकरांची साथ मिळाली असल्याने येथे दोघे गुदगे बंधू सत्तासंघर्षात एकमेकांचे वैरी झाले आहेत. 

कऱ्हाडला माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील आणि राजाभाऊ पाटील-उंडाळकर यांच्यात सामना रंगला आहे. सत्तेच्या सारीपाटावर विजयी मोहरा होण्यासाठी हे दोघे चुलत बंधू एकमेकांविरोधात ठाकले आहेत. एकीकडे हा भाऊबंदकीचा वाद सुरू असताना दुसरीकडे मात्र, बंधूप्रेमाने आमदारांना झपाटले आहे. फलटणमध्ये विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी त्यांचे बंधू संजीवराजे नाईक-निंबाळकर यांना निवडून आणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर विराजमान करण्याची तयारी केली आहे. यावेळेस त्यांचाच अध्यक्षपदावर हक्क असेल. 

दुसरीकडे माजी मंत्री व कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांनी त्यांचे बंधू ऋषीकांत शिंदे यांना जावळीतून निवडून आणण्याची तयारी केली आहे. ते निवडून आल्यास आगामी पाच वर्षांमध्ये एक वर्ष तरी त्यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी मिळू शकते. यादृष्टीने त्यांची रणनीती आखली आहे. तर, पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी त्यांचे बंधू रविराज देसाई यांना यावेळेस जिल्हा परिषदेच्या सत्तेत आणण्याची जोरदार तयारी केली आहे. गेल्यावेळी रविराज देसाई यांना देसाई गटाच्या हुकमी तारळे गटातून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यावेळी त्यांना पराभव पत्करावा लागला होता. या वेळी तारळे गटातील देसाई गटाचे मुख्य शिलेदार ऍड. जाधव आणि रामभाऊ लाहोटी हे भाजपच्या तंबूत जाऊन बसले आहेत. त्यामुळे रविराज देसाई यांना मल्हारपेठ, मोरगिरी अशा हुकमी गटातून शंभूराज देसाई उमेदवारी देण्याची शक्‍यता आहे. रामराजे, शशिकांत शिंदे, शंभूराज देसाई यांच्यासाठी बंधूप्रेमातून ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. आता कोणाचे बंधूप्रेम यशस्वी होणार आणि कोणाची भाऊबंदकी तुटणार, हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Web Title: satara zp election