साताऱ्यात झेडपीच्या चाव्या राष्ट्रवादीकडेच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

भाजपचा चंचूप्रवेश, कॉंग्रेसची वाताहात

भाजपचा चंचूप्रवेश, कॉंग्रेसची वाताहात
सातारा - जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने 39 जागा जिंकत सलग चौथ्यांदा निर्विवाद सत्ता मिळविली. भारतीय जनता पक्षाने जिल्हा परिषदेत चंचूप्रवेश केला असून, शिवसेना काठावर पास झाली आहे. अपक्ष, सातारा विकास आघाडी, कऱ्हाड विकास आघाडी व पाटण विकास आघाडीनेही आपली संख्या राखली आहे. गेल्या वेळी 21 जागा असलेल्या कॉंग्रेसला यावेळेस दोन आकडी संख्या गाठता आलेली नाही.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विरोधकांनी स्वबळाचा नारा दिल्याने ते विखुरले गेल्याने राष्ट्रवादीला निवडणूक सोपी झाली. त्यांचा बालेकिल्ला अभेद्य राहिला आहे. जिल्हा परिषदेच्या 64 जागांपैकी 39 जागा जिंकत राष्ट्रवादीने निर्विवाद सत्ता मिळविली आहे. जिल्हा परिषदेत दुसऱ्या क्रमांकावर कॉंग्रेससोबत भाजप हा पक्ष राहिला आहे. या दोन्ही पक्षांना प्रत्येकी सात जागा मिळाल्या आहेत. गेल्यावेळी कॉंग्रेसचे 21 सदस्य जिल्हा परिषदेत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निवडणुकीत कॉंग्रेसला कशाबशा सात जागा जिंकता आल्या आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील तीन जागा जिंकल्या; पण त्यांनी कऱ्हाड, सातारा व कोरेगाव या विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी एक गट जिंकून या तालुक्‍यातील आमदारांपुढे आपला दबावगट निर्माण केला आहे. कऱ्हाड दक्षिणमध्ये तीन जागांवर राष्ट्रवादीसोबत आघाडी करूनही केवळ वारुंजी गटात कॉंग्रेसला यश मिळाले. शंभूराज देसाई यांच्या पाटण विकास आघाडीला एक गट आणि दोन गणांवर समाधान मानावे लागले. तर खंडाळ्यात राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष आणि महाबळेश्‍वरमध्ये तळदेव गटातून शिवसेनेचा पुरस्कृत एक अपक्ष निवडून आला आहे.

नऊ पंचायत समित्या राष्ट्रवादीकडे
राष्ट्रवादीला अकरापैकी नऊ पंचायत समित्या ताब्यात ठेवण्यात यश मिळाले. यामध्ये सातारा, कोरेगाव, जावळी, वाई, खटाव, माण, महाबळेश्‍वर, फलटण, पाटण या पंचायत समित्यांचा समावेश आहे. खंडाळा पंचायत समितीत अपक्षांच्या आधारावर सत्ता मिळवावी लागणार आहे. कऱ्हाड पंचायत समितीत भाजप माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या मदतीने सत्तेवर येणार आहे.

जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या सर्व आठ आमदारांनी आपापल्या तालुक्‍याचे गड राखले आहेत. पण, कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील व माणचे आमदार जयकुमार गोरे यांना गड राखता न आल्याने त्यांच्या आमदारकीवरच घाव पडला आहे.

पक्षीय बलाबल
एकूण जागा 64
राष्ट्रवादी 39
कॉंग्रेस 7
भाजप 7
स्थानिक आघाड्या 7
शिवसेना 2
अपक्ष 2

Web Title: satara zp keys goes to ncp