खुल्या गटांत राजकीय "दंगल' 

zp-satara
zp-satara

सातारा - जिल्हा परिषदेच्या खुल्या गट व पंचायत समितीच्या गणांत इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. प्रत्येक जण आशेने उमेदवारी अर्ज भरत आहेत. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराची कोंडी होऊ नये, यासाठी इच्छुकांना आवर घालण्यासाठी नेते मंडळींनी मॅरेथॉन बैठकींवर जोर दिला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते आघाडीवर दिसतात. या पक्षाच्या सर्व आमदारांनी बंडखोरी रोखण्यासाठी गट, गणनिहाय बैठकांवर भर दिला आहे. एकूणच खुल्या गट व गणांत उमेदवारीसाठी राजकीय "दंगल' सुरू असल्याचेच चित्र आहे. 

जिल्ह्यातील 64 गट व 128 गणांपैकी 21 गट आणि 64 गणांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील (खुले) आरक्षण आहे. याठिकाणी सर्वच पक्षांतून इच्छुकांची संख्या मोठी आहे. या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवातही केली आहे. सध्या केवळ भाजपची 11 गट व 19 गणांतील उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. उर्वरित पक्षांच्या उमेदवार याद्या गुलदस्त्यात आहेत. राष्ट्रवादीकडे सर्वाधिक इच्छुक असून, प्रत्येक गट व गणांतून पक्षाचे अधिकृत उमेदवार निश्‍चित झाले आहेत; पण नाराज इच्छुक दुसऱ्या पक्षात जाऊ नयेत, याची काळजी घेत उमेदवारी अर्जाच्या अखेरच्या दिवसापर्यंत यादीच जाहीर न करण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. अधिकृत उमेदवारांना अखेरच्या दिवशी "एबी' फॉर्म देण्याची व्यवस्था केली आहे. या सर्व परिस्थितीत पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी खुल्या गटातून इच्छुक हातघाईवर आलेले दिसतात. ही हातघाई आताच रोखली नाही, तर बंडखोरी होऊन पक्षाचा अधिकृत उमेदवार अडचणीत येऊ शकतो, अशी शक्‍यता आहे. त्यामुळे या बंडखोरांची समजूत काढण्यासाठी राष्ट्रवादीच्या आमदारांवर प्रत्येक गट, गणनिहाय बंडोबांची मनधरणी करण्याची वेळ आली आहे. ही मनधरणी करण्यासाठी आमदारांनी खुले गट, गणांतील इच्छुकांची स्वतंत्र बैठका घेण्यावर जोर दिला आहे. या बैठकांतून इच्छुकांकडून एकमेकांवर आरोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. त्यामुळे नेत्यांना या सर्वांची समजूत काढून पक्षाच्या उमेदवारासाठी "सेफ' वातावरण निर्माण करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यासाठी या इच्छुकांनी इतर पदांचे लालसही दाखवले जात आहे. काही वेळेस गोड बोलून, तर काही वेळेस थोडे कान धरून इच्छुकांची मनधरणी करावी लागत आहे. एकीकडे बंडखोरांना थोपविणे आणि दुसरीकडे सक्षम व चांगला उमेदवार निश्‍चित करणे अशी दुहेरी भूमिका आमदार व नेत्यांना साकारावी लागत आहे. 

सर्वसाधारण महिला राखीव गटातूनही इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यात आजी, माजी जिल्हा परिषद सदस्यांच्या पत्नींचाही समावेश आहे. पक्षाच्या नेत्यांकडे पत्नीलाच उमेदवारी मिळविण्याकडे मनधरणी सुरू केली आहे. यादी अंतिम केलेल्या ठिकाणी बंडखोरीची भाषा पुढे येऊ लागली आहे. त्यामुळे महिला उमेदवारांचीही बंडखोरी होणार का, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. 

जिल्हा परिषदेसाठी आरक्षित खुले गट 
तांबवे, शेंद्रे, वर्णे, म्हावशी, कुडाळ, कोपर्डे हवेली, मल्हारपेठ, पिंपोडे बुद्रुक, तरडगाव, गिरवी, हिंगणगाव, आंधळी, वाठार किरोली, म्हसवे, खेड बुद्रुक, शिरवळ, मसूर, येळगाव, विंग, मुंद्रुळ कोळे, ल्हासुर्णे. पंचायत समितीच्या 64 गणांमध्ये खुल्या प्रवर्गाचे आरक्षण पडले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com