'मतभेद बाजूला ठेवून कामाला लागा'

27dec16-kop3
27dec16-kop3

कोल्हापूर - आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत कॉंग्रेसची ज्याला उमेदवारी मिळेल त्याच्या पाठिशी राहण्याचा निर्धार आज दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आला. दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या पाच व पंचायत समितीच्या दहा उमेदवारांना विजयी करण्यासाठी आपसातील मतभेद बाजूला ठेवून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केले. ड्रीम वर्ल्ड येथे ही बैठक झाली. बैठकीस ऋतुराज पाटील व प्रतिमा पाटील उपस्थित होत्या. 

आमदार पाटील यांनी यावेळी आपल्याला संपूर्ण जिल्ह्यात फिरावे लागणार असल्याने दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या निवडणुकीची जबाबदारी ऋतुराज व प्रतिमा यांनी घ्यावी आणि ती कार्यकर्त्यांच्या मदतीने पार पाडावी, असेही सांगितले. 

श्री. पाटील म्हणाले, ""माझी चूक तोंडावर सांगण्याचे धाडस असणारे कार्यकर्ते माझ्याकडे आहेत, याचा मला अभिमान आहे. तसे बोलणारे कार्यकर्ते असावे लागतात. चौदा महिन्यांच्या काळात कोण लांबचे आणि कोण जवळचे हेदेखील आपणाला कळले आहे. त्यामुळे यापुढे आपण सावध राहिले पाहिजे. गेल्या वेळी आपण काही जागा बिनविरोध निवडून आणल्या होत्या; पण आज ती स्थिती नाही. कॉंग्रेस सत्तेत नसल्यामुळे यावेळच्या निवडणुकीत आपणास ताकदीने उतरण्याची आवश्‍यकता आहे. उमेदवार निवडताना निश्‍चितपणे पात्रता आणि कुवत पाहूनच उमेदवारी दिली जाईल. भाजप सरकारने अनेक चुकीचे निर्णय घेतले आहेत. इव्हेंट मॅनेजमेंटच्या धर्तीवर भाजपचे काम सुरू आहे. छत्रपती शिवरायाच्या स्मारकाच्या बांधकामाला दीड वर्षापूर्वी मंजुरी मिळाली होती; पण मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर असल्यामुळे त्यांनी आता या स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदुमिलच्या स्मारकाच्या बाबतीतही असाचा प्रकार घडला आहे. अद्याप या स्मारकाच्या कामाला सुुरवात झालेली नाही. हे सर्व जनेतपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला पाहिजे. शहरातील लोकांनी माझ्यावर विश्‍वास दाखविल्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या जास्त जागा निवडून आल्या आणि महापौर झाला. आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. प्रत्येक गावात आपला गट मजबूत आहे; पण त्यांच्यामध्ये हेवेदावे आहेत. ते बाजूला ठेवून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एकत्र या. जर आपली सत्ता आली नाही, तर त्याठिकाणी विकासकामे करताना अडचणी निर्माण होतात. हे आपण अनुभवले आहे. त्यासाठी जो उमेदवार निश्‍चित केला जाईल, त्यांच्या पाठिशी आपण सर्वांनी राहावे.'' 

यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे आपली मते मांडली. जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी प्रास्ताविक केले. अशोक पाटील म्हणाले, ""दुहेरी निष्ठा ठेवायचे कार्यकर्त्यांनी आता बंद करावे. ते फार काळ टिकत नाही. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत आमदार पाटील यांच्या विरोधात जिल्ह्यात नव्हे, तर राज्यातील नेते एकत्र येतील. अशा परिस्थितीत स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढत असते. ती पार पाडण्यासाठी सर्वांनी सज्ज राहवे.'' 

यावेळी दयानंद स्वामी, पी. डी. पाटील, चंद्रकांत अतिग्रे, संजय पाटील, सचिन चौगुले, सूरज पाटील, मनीषा वास्कर, किरण पवार, महापालिकेचे सभागृह नेते प्रवीण केसरकर, जनार्दन पाटील, भूपाल कद्रे, सुभाष सोनुले, मच्छिंद्र सावंत, पंचायत समिती सभापती स्मिता गवळी, किरण पाटील आदींची भाषणे झाली. 

बैठकीस जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब माळी, एकनाथ पाटील, बाजार समितीचे उपाध्यक्ष विलास साठे, "बिद्री'चे संचालक श्रीपतराव पाटील, सुवर्णा गुरव, भुजगोंड पाटील, सचिन पाटील, मारुती निगवे, श्रीकांत बनछोडे आदी उपस्थित होते. 

कार्यकर्त्यांकडे कानाडोळा करू नका 
जयवंत घाटगे म्हणाले, ""आमदार सतेज पाटील यांच्यावर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत. त्यांचे काही काम नसते; पण केवळ त्यांना भेटण्यासाठी काही कार्यकर्ते येत असतात. त्यामुळे अशा कार्यकर्त्यांकडे कानाडोळा करू नका. जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक आम्ही निवडून देतो. निवडून आल्यानंतर मात्र तुम्ही त्यांच्यातच न रमता सामान्य कार्यकर्त्यांमध्ये मिसळा.'' 

विमा नेमका कोणासाठी 
मतदारसंघात आपण कोट्यवधीची विकासकामे केली; पण दोन वर्षांत दक्षिणमधील भाजपच्या आमदारांनी काय केले, असा सवाल उपस्थित करत आमदार पाटील म्हणाले, ""आम्ही लोकांच्या कल्याणासाठी, लोकांचे संसार फुलविण्यासाठी योजना राबविल्या. भाजपच्या आमदारांनी मात्र मतदारसंघात विम्याची योजना राबविली. त्याची रक्कम मतदाराला त्याच्या निधनानंतर मिळणार आहे. त्यामुळे भाजपच्या या आमदारांना नेमकी ही योजना मतदारांसाठी राबवायाची आहे, की मतदारसंख्या कमी करण्याच्या हेतूने राबवायची आहे, हेच समजत नाही.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com