सतेज पाटील विरुद्ध महादेवराव महाडिकच

निवास चौगले
गुरुवार, 11 मे 2017

वाद थेट पाईपलाईनचा - बावड्याचा सरदार, शिरोलीचा शकुनीमामा विश्‍लेषणाने शहरवासीयांची करमणूकच

वाद थेट पाईपलाईनचा - बावड्याचा सरदार, शिरोलीचा शकुनीमामा विश्‍लेषणाने शहरवासीयांची करमणूकच
कोल्हापूर - शहराच्या थेट पाईपलाईन योजनेवरून महापालिकेतील सत्तारूढ व विरोधी आघाडीकडून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपातून एकमेकांची उणीदुणी काढण्याचे काम सुरू आहे. योजना रखडलेली आहे. त्यातच काम संथगतीने सुरू असताना सुरू झालेल्या या वादात माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील विरुद्ध माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यातील वाद समर्थकांमार्फत पुन्हा चव्हाट्यावर येत आहे.

बावड्याचा सरदार, शिरोलीचा शकुनीमामा, दुर्योधन अशी विश्‍लेषणे लावून एकमेकांवर टीकेची झोड उठवली जात आहे. त्यातून कोण कोणत्या प्रकरणात गुंतला आहे, कोणी किती रुपये खाल्ले, कुणाची संपत्ती कुणी लाटली, असे धक्कादायक प्रकार पुढे येत आहेत. लोकांची मात्र यातून चांगलीच करमणूक सुरू आहे.

शहराला काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनने पाणीपुरवठा व्हावा, ही 35 वर्षांची मागणी होती. कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळात ही योजना मंजूर झाली नाही, तर आमदारकी न लढवण्याचा इशारा तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिला होता. सरकारी पातळीवरील सततचा पाठपुरावा, राज्यात व देशातही कॉंग्रेस आघाडीचे सरकार यातून 2014 ला योजनेला मंजुरी मिळाली. परंतु, "नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्नं' अशीच या योजनेची आजची स्थिती आहे. निधी आला आहे, कामही सुरू झाले; पण काही महत्त्वाच्या परवानग्या वेळेत न मिळाल्याने काम रखडले आहे. योजना पूर्ण व्हायची मुदत संपली असताना आता यातील गैरव्यवहारावरून नगरसेवकांच्या आडून नेत्यांत जुंपली आहे.

20 लाखांचा साकव 20 कोटींचा कसा झाला? या कामात कोणी किती ढपला पाडला? यासारखे प्रश्‍न विचारून महापालिकेतील विरोधातील भाजप आघाडीने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. हे करत असताना नगरसेवकांपेक्षा नेत्यांवरच तोंडसुख घेतले जात आहे. त्यातून सतेज पाटील यांना "बावड्याचा सरदार', महाडिक यांना "शिरोलीचा शकुनीमाना', तर नगरसेवक सत्यजित कदम यांना "दुर्योधन' यासारखी विश्‍लेषणे लावली जात आहेत. वाद थेट पाईपलाईनचा; पण वैयक्तिक पातळीवर सुरू असलेल्या टीकेने नागरिकांची मात्र चांगलीच करमणूक होत आहे.

टोलेबाजी भलतीकडेच
विरोधी भाजप आघाडीच्यावतीने नगरसेवक सत्यजित कदम यांच्याकडून, तर सत्ताधाऱ्यांमार्फत उपमहापौर अर्जुन माने, गटनेते शारंगधर देशमुख यांच्यामार्फत ही पत्रकबाजी सुरू आहे. योजना सुरू होण्यासाठी हातात हात घालून काम करण्याची गरज असताना त्यात पैसे किती खाल्ले, या आरोपावरून सुरू असलेली टोलेबाजी भलतीकडेच जात आहे, एवढे निश्‍चित.

Web Title: satej patil vs mahadevrao mahadik