रस्ता सहापदरी अन्‌ पूल दुपदरी!

आनेवाडी - महामार्ग सहापदरी तर पूल दुपदरी असल्यामुळे वारंवार अपघात घडत आहेत.
आनेवाडी - महामार्ग सहापदरी तर पूल दुपदरी असल्यामुळे वारंवार अपघात घडत आहेत.

सायगाव - पुणे-बंगळूर महामार्गावरील आनेवाडी आणि विरमाडे पुलांची तऱ्हा ‘रस्ता सहापदरी अन्‌ पुल दुपदरी’ अशी झाल्यामुळे वाहनचालकांची वाहने हाकताना जीवघेणी कसरत ठरत आहे. 

पुणे-बंगळूर महामार्गावर गेल्या तीन वर्षांपासून सहापदरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे येथील टोलनाका परिसरात असणारे विरमाडे व आनेवाडी पूल मोठे धोकादायक बनले आहेत. काम सुरू असताना या जुन्या पुलांची लेन वाढवणे गरजेचे असताना दोन लेनवरच पुलाचे काम आहे, तसेच ठेवून वाहनांना जीवघेणी कसरत करावयास भाग पाडले जात आहे. त्यामधून आठवड्याला होणारे जीवघेणे अपघात ही संबंधित कंपनी मोजत बसली आहे की काय? असा संतप्त सवाल नागरिकांकड़ून विचारला जात आहे. लिंबच्या गौरीशंकर कॉलेजपासून असणारा तीव्र उतार हा आनेवाडीच्या उड्डाण पुलापर्यंत येतो. वाहनेही त्यामुळे वेगाने येतात आणि या पुलाजवळ आल्यानंतर गडबडून जातात व तिसऱ्या लेनवरील वाहन अचानक पुलावरील दुसऱ्या लेनवर घेतले जाते. परिणामी पाठीमागून वेगात येणाऱ्या वाहानांबरोबर अपघाताचा धोका निर्माण होतो. 

उड्डाण पुलाच्या अगोदरच असणारा दोन लेनचा हा पूल असल्यामुळे दुचाकी चालक, कारचालक अचानक गडबडून जात आहेत व त्याचा परिणाम मोठ्या अपघातांमध्ये होत आहे. आनेवाडी व विरमाडे येथील या प्रकारामुळे अनेक निरपराध लोकांनी आपले जीव गमावले आहेत. असे असताना अरुंद असणाऱ्या पुलाची रुंदी न वाढवता संबंधित कंपनी दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. बांधकाम कंपनीने असेच काम रेटण्याचा प्रकार करून फसवणुकीचा धंदा सुरू ठेवला आहे.

ठेकेदाराकडे विचारणा केली तर कोणतेही समाधानकारक उत्तर मिळत नाही किंवा दखल घेतली जात नाही. याबाबत नागरिक, प्रवाशांनी कोणाकडे दाद मागायची, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.

आनेवाडी आणि विरमाडे पूल हे धोकादायक आहेत. महामार्गावर होणाऱ्या एकूण अपघातांपैकी महिन्याला किमान दहा ते बारा अपघात हे या पुलांवर होत आहेत. या पुलांबाबत तातडीने उपाययोजना करावी, अन्यथा निरपराध लोकांचे प्राण जात राहणार हे नक्की. 
- संतोष मिस्त्री, गॅरेज चालक 

महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामाचे नियोजन योग्य न केल्यामुळे स्थानिकांसह प्रवासी व वाहनचालकांना मोठ्या संकटाना तोंड द्यावे लागत आहे. यावर लवकरात लवकर उपाययोजना करावी, अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल.
- भानुदास फरांदे, सदस्य, ग्रामपंचायत, आनेवाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com