सुटीत होणार 'स्कूलबस'ची तपासणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

श्रीरामपूर - शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या बसगाड्यांची उन्हाळ्याच्या सुटीत तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भारत कळसकर यांनी आज "सकाळ'ला सांगितले. शालेय मुलांच्या वाहतुकीमधील सुरक्षिततेच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली. तिच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या बसची फेरतपासणी करण्याचा आदेश दिला. त्यानुसार ही तपासणी करण्यात येणार आहे.

बसगाड्यांच्या तपासणीसाठी सरकारने अधिसूचना काढून स्कूलबस नियमावली लागू केली आहे. त्यातील तरतुदीनुसार "चेकलिस्ट' तयार करण्यात आली आहे. त्यानुसार बसची तपासणी केली जाईल, असे कळसकर यांनी सांगितले. बसच्या तपासणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. ही तपासणी एक मे ते 31 मे या कालावधीत होईल.