दुर्गम कसणीतील विद्यालय अखेर बंद 

दुर्गम कसणीतील विद्यालय अखेर बंद 

ढेबेवाडी - अनेक दुर्गम गावे आणि वाड्यावस्त्यांतील विद्यार्थी शिक्षण घेत असलेले मस्करवाडी (कसणी, ता. पाटण) येथे दहा वर्षांपासून कार्यरत माध्यमिक विद्यालय मान्यतेच्या कारणावरून बंद ठेवण्यात आले आहे. डोंगर परिसरात सुमारे 16 किलोमीटरच्या परिसरात दुसरे माध्यमिक विद्यालयही नसल्याने विद्यार्थ्यांचा प्रवास आणि पायपिटीतच जादा वेळ खर्च होत आहे. 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये कसणी समाविष्ठ आहे. वर्षानुवर्षे मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेल्या कसणीतील शिक्षणाची गैरसोय ओळखून स्थानिकांनी श्री निनाईदेवी शिक्षण संस्थेची स्थापना केली. 16 जून 2008 रोजी तेथे शामरावजी मस्कर विद्यालय सुरू झाले. सुरवातीला संस्थापक मारुती मस्कर यांच्या घरात शाळा भरायची. 2009 मध्ये इमारत बांधण्यात आली. विविध जिल्ह्यांतून आलेले नऊ शिक्षक व कर्मचारी तिथे ज्ञानदानाची सेवा बजावत होते. कसणीसह वाड्या-वस्त्यांतून विद्यार्थी शिक्षणासाठी येत होते. गेल्या काही वर्षांपासून या विद्यालयाच्या मान्यतेचा मुद्दा गाजत होता. अखेर यावर्षी या विद्यालयाला कुलूपच लागले. नशीब आजमावयाला आलेले शिक्षक व कर्मचारी तिथून निघून गेले. 

जवळपास विद्यालय नसल्याने विद्यार्थ्यांच्याही नशिबी पुन्हा पायपीट आली. सध्या 15 ते 20 किलोमीटरवरील मेंढ, आरळा, आचरेवाडी, तळमावले येथील विद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. प्रवास आणि पायपिटीतच त्यांचा जादा वेळ खर्च होत आहे. सध्या तेथील काही विद्यार्थी शिक्षणासाठी नातेवाईकांकडे, तर काही वसतिगृहात थांबल्याचे सांगण्यात आले. 2012 मध्ये कसणीचा बहृत आराखड्यात समावेश झाला. त्यानुसार 2013 मध्ये शाळा मान्यतेचा प्रस्ताव सादर केला. मात्र, त्यावर ठोस निर्णयच झाला नाही. विद्यालयाला जोडून बांधण्यात येणाऱ्या वसतिगृहाचाही प्रस्ताव समाजकल्याणकडे पडून आहे, असे संस्थापक मारुती मस्कर यांनी सांगितले. 

दुर्गम भागातील विद्यालयाबद्दल शासनाने सहानभूतीपूर्वक आणि वस्तुस्थिती जाणून निर्णय घेतलेला नाही. त्यामुळेच विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. 
- मीनल मस्कर, सरपंच, कसणी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com