भंगार बाजारलगतचा भूखंड ढापला

भंगार बाजारलगतचा भूखंड ढापला

सांगली - कोल्हापूर रस्त्यावरील भंगार बाजारशेजारील चार एकराच्या भूखंडाचे सपाटीकरण करून त्यात प्लॉट पाडले जात आहेत. पंधरा दिवस पालिकेच्या यंत्रणेकडून आवश्‍यक कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू आहे. आयुक्तांनी कायदेशीर नोटीस वृत्तपत्रांतून बजावली आहे. काल मालमत्ता अधिकारी रमेश वाघमारे यांनी पुन्हा वैयक्तिक नोटीस बजावून भूखंडासंबंधातील सर्व कागदपत्रे सात दिवसांत सादर करा, असे आदेश दिलेत.

याबाबतची माहिती अशी, की कोल्हापूर रस्त्यावरील पूर्व बाजूस टीव्ही केंद्र व भंगार बाजाराजवळील सुमारे चार एकराचा सर्व्हे क्रमांक ४८९ (ब) भूखंड महापालिकेच्या मालकीचा आहे. तशी नोंद २८ मार्च रोजी काढलेल्या सात-बारा उताऱ्यावर व आजही आहे. पालिकेच्या मालकीच्या भूखंडावर मैला डेपोच्या आरक्षणाचा उल्लेख आहे. नगरसेवक बाळासाहेब गोंधळी, शिवराज बोळाज, हेमंत खंडागळे यांच्या स्वाभिमानी आघाडीच्या सर्वच नगरसेवकांनी भूखंड वाचवावा यासाठी आयुक्त रवींद्र खेबुडकर यांची भेट घेतली. त्यांनी तत्काळ प्रशासनाला माहिती घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर या भूखंडाबाबत कोणतेही खरेदी-विक्रीचे व्यवहार करू नयेत, अशी नोटीस दिली. मात्र जागेवर सपाटीकरणाचे काम सुरूच आहे. 

मालमत्ता अधिकारी श्री. वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘सर्व्हे क्रमांक ४८९  (ब) वरील बांधकामाबाबत कालच नोटीस बजावली आहे. या भूखंडाची मालकी महापालिकेचीच आहे. मात्र त्याची कब्जेपट्टी नाही. याबाबतच्या वादाची सुनावणी सध्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुरू आहे. मात्र त्याआधीच या जागेवर कामे सुरू आहेत. परवानगीविना सुरू असलेल्या कामाची कागदपत्रे सात दिवसांत सादर करण्याबाबत बाळासाहेब जितेंद्र मंगाजे यांना ही नोटीस बजावली आहे.’’

नगरसेवक श्री. गोंधळे म्हणाले, ‘‘पालिकेच्या मालकीचा कोट्यवधींचा हा भूखंड असून तो वाचवण्यासाठी आयुक्तांसमोर गाऱ्हाणे मांडले होते. त्यांनी तत्काळ प्रतिसाद देत कार्यवाहीचे आदेश दिले. मात्र नगररचना व मालमत्ता विभागाकडून आवश्‍यक अशी तातडीची कायदेशीर कार्यवाही होताना दिसत नाही. दोन्ही विभाग एकमेकांवर चालढकल करीत वेळेचा अपव्यय करीत आहेत. नगररचना विभागाचे अधिकारी अचानकपणे रजेवर गेलेत. त्यामागचे कारण समजून येत नाही. मात्र आम्ही प्रामाणिकपणे ही मालमत्ता वाचवण्यासाठी शेवटपर्यंत हा लढा सुरू ठेवू ’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com