बँक अधिकारी म्हणाला, बायको आणि आईला विक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

बायकोला आणि आईला विक आणि बॅंकेचे पैसे भर' अशा अजब सल्ल्याची ऑडिओ क्‍लिप आज व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात यापूर्वीच गुन्हा दाखल आहे.

कोल्हापूर, ता. 1 : "बायकोला आणि आईला विक आणि बॅंकेचे पैसे भर' अशा अजब सल्ल्याची ऑडिओ क्‍लिप आज व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात यापूर्वीच गुन्हा दाखल आहे. मात्र, बॅंकेने अद्याप चौकशी करू अथवा कारवाई करू, असे आश्‍वासन दिले नसल्याचे फिर्यादी श्रेयस पोतदार यांच्याकडून सांगण्यात आले.

मंगळवार पेठेतील बेलबाग येथे श्रेयस संजय पोतदार यांनी दीड वर्षापूर्वी एका बॅंकेचे क्रेडिट कार्ड घेतले होते. त्याची आर्थिक क्षमता एक लाख 89 हजार रुपये होती. त्याचा वापर पोतदार यांनी केला. त्यांची एक लाख 22 हजार रुपये इतकी थकबाकी होती. बॅंकेच्या मुंबई शाखेतील वसुली अधिकारी सुप्रिया पाठक आणि शीतल (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) या दोघींनी 27 एप्रिलला फोन केला. दोघींनी पोतदार व त्यांच्या पत्नीला फोन करून भीक मागा, मात्र बॅंकेचे पैसे भरा, असे सुनावले होते. तसेच, पत्नी व आईबाबत अश्‍लील भाषा वापरली होती. या प्रकरणी पोतदार यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सुप्रिया व शीतल यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. याचप्रकरणी आज एक ऑडिओ क्‍लिप व्हायरल झाली. संबंधित बॅंकेच्या वसुली अधिकाऱ्यांनी पत्नी व आईला विक; पण पैसे भर, असा सल्लाही दिल्याचा दावा पोतदार यांनी केला.

ही क्‍लिप काही वृत्तवाहिन्यांवरही प्रसारित झाली. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली. संबंधित ऑडिओ क्‍लिप जुना राजवाडा पोलिसांना दिली असून, त्यांचा तपास सुरू आहे. मात्र, अद्याप संबंधित बॅंकेने त्या दोन वसुली अधिकाऱ्यांची चौकशी करतो अगर कारवाई करतो, असे कोणतेही लेखी अथवा तोंडी आश्‍वासन आपल्याला दिले नसल्याचे श्रेयस पोतदार यांनी सांगितले.

Web Title: Sell your wife, mother to pay credit card bill say bank officers