‘खो-खो’त मंगरुळच्या सात कन्यांचा दबदबा 

दिलीप कोळी
सोमवार, 1 मे 2017

मुली आज प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवताहेत. दंगल चित्रपटातील कुस्तीपटू बहिणींची ती कथा साऱ्यांच्या डोळ्यासमोर ताजी आहे. अशीच दुष्काळी भागातील मंगरुळ (ता. खानापूर) येथील सात जिगरबाज मुली ‘खो-खो’ची मैदानं गाजवू लागली आहेत. राज्य, राष्ट्रीय स्पर्धातून खेळून सुवर्ण, रौप्य, ब्राँझ पदके खेचून आणत जिल्ह्याचे नाव उंचवले आहे. लोकसहभाग, देणग्यातून आर्थिक पाठबळही त्यांना मिळते. त्यांचीही चमकदार कामगिरी... 

मुली आज प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवताहेत. दंगल चित्रपटातील कुस्तीपटू बहिणींची ती कथा साऱ्यांच्या डोळ्यासमोर ताजी आहे. अशीच दुष्काळी भागातील मंगरुळ (ता. खानापूर) येथील सात जिगरबाज मुली ‘खो-खो’ची मैदानं गाजवू लागली आहेत. राज्य, राष्ट्रीय स्पर्धातून खेळून सुवर्ण, रौप्य, ब्राँझ पदके खेचून आणत जिल्ह्याचे नाव उंचवले आहे. लोकसहभाग, देणग्यातून आर्थिक पाठबळही त्यांना मिळते. त्यांचीही चमकदार कामगिरी... 

दुष्काळी पट्ट्यातलं मंगरुळ गाव. अगदी सोळाशे लोकसंख्येचं ते गाव. घरकाम आणि शिक्षणातून खेळाकडं जाणाऱ्या मुली अगदी बोटावर मोजण्याइतक्‍याच. त्यातील ज्योती शिंदे, कोमल शिंदे, सारिका शिंदे, संगीता कोरे, तनुजा शिंदे, कोमल शिंदे, मोनाली शिंदे या सात मुली. २००७ पासून क्रीडाशिक्षक यशवंत चव्हाण व सम्राट शिंदे यांच्याकडे खो-खोच्या प्रशिक्षणाला सुरवात केली. ५ वर्षांच्या सरावानंतर २०१२-१३ पासून  राज्य व त्यानंतर राष्ट्रीयस्तरावरीय स्पर्धा मुली खेळू लागल्या. २०१३-१४ मध्ये मोनाली शिंदे व कोमल शिंदे यांनी पहिल्यांदा सुवर्णपदक मिळविले. त्यानंतर ज्योती शिंदे हिनेही सुवर्णपदक मिळविले. तेथून पुढे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पदके मिळविण्याचा खेळाडूंनी सपाटा लावला. ज्योती शिंदे हिने अजमेर (राजस्थान), वाराणसी, भुवनेश्‍वर (ओरिसा), उस्मानाबाद येथे तर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरतर्फे खेळून चार सुवर्णपदके मिळविली. तर मोनाली शिंदे हिने औरंगाबाद, वारणासी, अजमेर, परभणी येथे सुवर्णपदक, रौप्यपदक, ब्राँझ  पदक मिळविले. कोमल शिंदे हिने औरंगाबाद, गुजरात, पुणे, उज्जैन (मध्य प्रदेश) येथे तीन सुवर्णपदक व एक रौप्यपदक मिळविले. कोमल विजय शिंदे हिने सुवर्ण, रौप्य पदक मिळविले. सारिका शिंदे हिने वाराणसी, परभणी, अजमेर येथे दोन रौप्य व एक ब्राँझपदक मिळविले.संगीता कोरे हिनेही दोन रौप्य व एक ब्राँझपदक मिळविले. तनुजा शिंदे हिने परभणी येथे रौप्यपदक मिळविले. भन्नाट कामगिरी त्यांची सुरू आहे. 

तनुजा शिंदे, सारिका शिंदे, मोनाली शिंदे या शेतकरी कुटुंबातल्या मुली. आर्थिक परिस्थिती बेताचीच. मग, त्यांना स्पर्धेसाठी पाठवण्यासाठी पैशांचा प्रश्‍न उभारला.  तो प्रशिक्षिकांना लोकवर्गणीतून सोडवला. आज या सातही जिगरबाज मुली ‘खो- खो’त आपला दबदबा निर्माण करताहेत. ज्योती शिंदे हिला महाराष्ट्र शासनाचा गुणवंत खेळाडू, तर क्रीडाशिक्षक चव्हाण यांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारानेही गौरविण्यात आले.  मंगरूळ येथे ‘खो-खो’चे मैदान तयार केले आहे. त्याठिकाणी पाच तास मुली सराव करतात. या मुलींना खेळासाठी प्रोत्साहनाची गरज आहे. त्यांना पाठबळ दिल्यानंतर जिल्ह्याचे नाव आणखी उंचावेल, अशी अशा क्रीडाशिक्षकांनी व्यक्त केली आहे.