'पाठ्यपुस्तकांपेक्षा जगणं शिकवणं महत्त्वाचे '

'पाठ्यपुस्तकांपेक्षा जगणं शिकवणं महत्त्वाचे '

कोल्हापूर - ""वर्गातील पाठ्यपुस्तकापेक्षा समाजात कसे वागावे, कसे जगावे, हे शिकविणे महत्त्वाचे आहे. कर्मवीर भाऊराव पाटील हे भांडवलदार, सावकार, उद्योगपती नव्हते; पण समाज घडविणारे विदुषी होते. आण्णांनी शुन्यातून रयत संस्थेची निर्मिती केली,'' असे ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी सांगितले. रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण, व्हिजन 2020 दस्तावेजाचे प्रकाशन झाले. 

तत्पूर्वी, सरोज पाटील (माई) यांनी महाविद्यालयातील गुणवंत खेळाडूंसाठी ठेवलेल्या पाच लाख रुपयांच्या ठेवीवरील व्याजातून आलेली 40 हजार रुपयांची रक्कम प्रा. डॉ. पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना देण्यात आली. तसेच महाविद्यालयानेही अशा गुणवंत खेळाडूंना रोख रकमेची क्रीडा शिष्यवृत्ती दिली. जिमखाना सचिव प्रा. डॉ. धनंजय नलवडे यांनी वार्षिक जिमखाना अहवालाचे वाचन केले. खेळाडूंच्या बक्षिसांचे वाचन प्रा. विक्रमसिंह नांगरे-पाटील यांनी केले. प्रावीण्यप्राप्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बक्षिसांचे वाचन प्रा. डॉ. एस. व्ही. पाटील यांनी केले. 

प्रभारी प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार म्हणाले, ""शाहू महाविद्यालयाने "शाहू व्हिजन 2020'चा आराखडा तयार केला आहे. उदात्त मानवी संस्कार असणारी मुले तयार करणे, हे उद्दिष्ट आहे. महाविद्यालयात झोपडपट्टीतील 70 टक्के तर ग्रामीण भागातील 30 टक्के विद्यार्थी शिकत आहेत. स्थापनेपासून आतापर्यंत 190 राष्ट्रीय खेळाडू महाविद्यालयाने घडविले आहेत. यामध्ये पुष्पलता मंगल, राम सारंग, डॉ. भेंडिगिरी आदींचा समावेश आहे.'' 

हुपरी येथील महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय साठे, सागर प्रशांत पाटील आंतरराष्ट्रीय जलतरण तलावाचे मुख्य प्रशिक्षक नीळकंठ आरवाडे, मुष्ठीयुद्ध प्रशिक्षक कॅप्टन सासने, आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक प्रा. डॉ. रमेश भेंडिगिरी उपस्थित होते. उपप्राचार्य प्रा. राजेंद्र देठे यांनी आभार मानले. 

विद्वतेपेक्षा बांधिलकी गरजेची... 
प्रा. डॉ. पाटील म्हणाले, ""महाविद्यालयीन शिक्षणानंतर विद्यार्थ्यांनी ज्ञानाचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी करून राष्ट्रप्रगतीस हातभार लावावा. शिक्षणातून आपल्याला विचारधारा मिळते. या विचारधारेतून पुढील जीवनासाठीची दिशा स्पष्ट होते. परीक्षांसाठी निश्‍चित केलेल्या अभ्यासक्रमांबरोबरच इतर गोष्टींचे विद्यार्थ्यांना आकलन झाले पाहिजे. पदवी गरजेची असली तरी समाजात वावरताना ती फारशी महत्त्वाची नसते. समाज आणि विद्यापीठ वेगवेगळी असतात. विद्वतेपेक्षा सामाजिक बांधिलकी गरजेची आहे. यामुळे महाविद्यालयातून नवी जीवनमूल्ये घेऊन बाहेर पडा.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com