शैलेशला वाचविण्याची शर्थ ठरली व्यर्थ...

जंगल पदभ्रमतीत अचानक मृत्यू झालेल्या शैलेश भोसले यांचे या मोहिमेतील अखेरचे छायाचित्र.
जंगल पदभ्रमतीत अचानक मृत्यू झालेल्या शैलेश भोसले यांचे या मोहिमेतील अखेरचे छायाचित्र.

कोल्हापूर - डोंगरदरी, जंगल, गडकिल्ले यावर नितांत प्रेम करणाऱ्या शैलेश भोसलेने काल ढाकदरीच्या जंगलातच अखेरचा श्‍वास घेतला. क्षणापूर्वी सर्व सहकाऱ्यांसोबत हसत-खेळत असणाऱ्या, ‘चला रे’ म्हणत सर्वांना घेऊन पुढे जाणाऱ्या शैलेशचे पाऊल चालता चालता अचानक थबकले. त्याने मानच टाकली. ‘अरे शैलेश, अरे शैल्या!’ अशा हाका मारत त्याच्या सहकाऱ्यांनी त्याची छाती दाबत प्रथमोपर सुरू केले. पण शैलेशची जीवनयात्राच संपली होती. मग बांबूची झोळी तयार करून पळवत पळवत जंगलातून, काट्याकुट्यातून मुख्य रस्त्यावर आणेपर्यंत चार तासांची केविलवाणी शर्थ करावयाची वेळ त्याच्या साथीदारांवर आली.

शैलेश हा कोल्हापुरातल्या क्रीडा क्षेत्रातील दिग्गज बाबा भोसले यांचा मुलगा. काल तो कोल्हापुरातील त्याच्या २२ सहकाऱ्यांसोबत जांभवली ते ढाकभैरी येथे पदभ्रमंतीसाठी गेला होता. वाटेत हृदयविकाराच्या तीव्र धक्‍क्‍याने त्याचा मृत्यू झाला. त्याचा हा मृत्यू कोल्हापूरवासीयांना चटका लावून गेला. काल सकाळी शैलेश व त्याच्या सहकाऱ्यांनी पदभ्रमंतीस सुरुवात केली. वाटेत कळकराय हा एक सुळका होता. तो दोराच्या साह्याने पार केला. जंगल, उंचसखल डोंगर, गार वारे अशा वातावरणात ते चालत राहिले. एका टप्प्यावर निम्मे सहकारी पुढे गेले. ज्यांनी अगोदर हा ट्रेक केला, ते थांबले व सावलीत बसून राहिले. शैलेशही बसून राहिला. चारच्या सुमारास पुढे गेलेले सहकारी परत आले व सर्वांनी मिळून पुन्हा परतीचा प्रवास सुरू केला. काही पावले त्यांनी टाकली आणि अचानक शैलेश जागेवरच कोसळला. आजूबाजूला फक्त जंगल, दहा किलोमीटरवर छोटे गाव. या परिस्थितीत शैलेशवर त्याच्या सहकाऱ्यांनी प्रथमोपचार सुरू केले. पण एकूण परिस्थिती पाहून बांबू व चादरीच्या साह्याने झोळी करून खांद्यावरून ही झोळी पळवत रस्त्यापर्यंत आले. तेथे रुग्णवाहिका बोलावून घेतली व कामशेत येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र शैलेशचा मृत्यू जागेवरच झाला होता.

सहकारी गेले भेदरून 
आपल्या उमद्या सहकाऱ्यावर आलेली ही वेळ पाहून त्याचे सर्व सहकारी अक्षरश: भेदरून गेले. काय बोलावे हेच त्यांना समजत नव्हते. या परिस्थितीत शैलेशचे चुलत बंधू निवृत्त पोलिस अधीक्षक सुरेश भोसले तेथे आले. त्यांनी परिस्थिती जाणून घेतली व त्यानंतर पुढची कार्यवाही झाली. पहाटे चारच्या सुमारास शैलेशचा मृतदेह कोल्हापुरात आणला. सकाळी पंचगंगा स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. शैलेशचे वडील बाबा भोसले हे क्रीडा संघटक व भाऊ शीतल भोसले हा राष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com