शिराळा नगरपंचायत निवडणूक एप्रिलमध्ये?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

शिराळा - शिराळा नगरपंचायतीची निवडणूक एप्रिल २०१७ मध्ये होणार आहे. त्यामुळे जि.प. व पंचायत समितीचा धुरळा खाली बसतोय न बसतोय, तोच नगरपंचायतीच्या निवडणुकीचा गदारोळ सुरू होईल. नागपंचमीला पुनर्वैभव मिळवून देण्यासाठी सर्वपक्षीयांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला होता. हा प्रश्‍न अजून सुटलेला नाही. त्यामुळे पुन्हा निवडणूक लागणार की लोकभावनेमुळे ती पुढे ढकलली जाणार, याबद्दल उत्सुकता आहे. 

नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकीवर नागपंचमीच्या मुद्यांवरून शिराळाकरांनी बहिष्कार टाकून राजकीय व प्रशासकीय यंत्रणेवरील राग व्यक्त केला. प्रारंभी आम्हाला पारंपरिक पद्घतीने नागपंचमी करण्यास परवानगी मिळत नाही, तोपर्यंत येणाऱ्या सर्व निवडणुकावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. 

तसे निवेदन तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. नगरपंचायतीचे प्रशासक तहसीदार दीपक शिंदे, मुख्याधिकारी अशोक कुंभार यांनी लोकांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. त्याला नागरिकांनी दाद दिली नाही. बहिष्काराची भूमिका कायम ठेवली. त्यामुळे नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर होणारी पहिली निवडणूक बहिष्कारामुळे गाजली आणि स्थगित झाली. शिराळकरांनी एकजूट दाखवून दिली.

एप्रिलमध्ये नगरपंचायत व नगरपरिषदेच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुका घेण्यात येणार आहेत. त्यात नव्याने स्थापन झालेल्या व बहिष्कारामुळे स्थगित झालेल्या शिराळा, तसेच सालेकसा, नेवासा, रेणापूर नगरपंचायतींचा समावेश आहे. निवडणुकीसाठी पाच जानेवारी २०१७ रोजी अस्तित्वात आलेली विधानसभेची मतदारयादी संबंधित प्रभागात विभागून वापरायची आहे. या मतदार याद्यांच्या विभाजनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाकडून पत्र देण्यात आले आहे.
 
शिराळकरांची भूमिका काय राहणार? 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिराळा येथे शेतकरी मेळाव्यात व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सागाव येथे नागपंचमीला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही दिली. त्याबाबत काय चर्चा होणार, याबद्दल उत्सुकता असली तरी शिराळकरांची भूमिका काय राहणार, याकडे राजकीय मंडळी व प्रशासनाच्याही नजरा आहेत.

Web Title: shirala nagarpanchyat election in april