सत्ता राष्ट्रवादीची; काँग्रेसची वाताहत

शिवाजीराव चौगुले
शनिवार, 27 मे 2017

शिराळा - शिराळ्याच्या पहिल्यावहिल्या नगरपंचायतीमध्ये माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी राष्ट्रवादीला एक हाती सत्ता मिळवून देत आपले शिराळ्यातील स्थान भक्कम केले. वाळवा, इस्लामपूरची फौज वापरून सर्वांत जास्त प्रचार यंत्रणा राबवूनही भाजपच्या वाट्याला विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची वेळ आली आहे; तर काँग्रेसला भोपळाही फोडता आला नसल्याने पक्षाची पूर्णपणे वाताहत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

नागपंचमीच्या मुद्यावरून आमदार शिवाजीराव नाईक व रणधीर नाईक यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात रान उठवून प्रचार यंत्रणा गतिमान केली होती. मानसिंगराव नाईक यांच्या घराण्यातील उदयसिंगराव नाईक, रणजितसिंह नाईक यांनी शिवाजीराव नाईक यांचे नेतृत्व स्वीकारून भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपचा मतदानाचा टक्‍का वाढला.

तसेच वाळव्याच्या सम्राट महाडिक यांच्या महाडिक युवा शक्‍तीशी संधान बांधून त्यांना आपल्या प्रवाहात घेतले. त्यांनीही नगरपंचायतीत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला. ग्रामपंचायतीचा भ्रष्ट कारभार, पहिल्यांदा राष्ट्रवादीनेच निवडणूक लादली, नागपंचमी अशा विविध विषयाला हात घालून भाजपने शिराळ्यात प्रचार यंत्रणा गतिमान केली. 

त्यास मंत्री सदाभाऊ खोत, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, सम्राट महाडिक, माजी आमदार भगवानराव साळुंखे यांचे प्रचारात रंगत भरण्यास सहकार्य लाभले. माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी नागपंचमीला गतवैभव मिळवून देण्याबरोबर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेली विकासकामे हाच अजेंडा ठेवून स्वत: मीच निवडणुकीला उभा आहे, असे भावनिक आवाहन केले. काँग्रेसने दोन्ही नाईकांच्या थेट लढतीचा फायदा उठवत सत्तेत वाट मिळण्याच्या अपेक्षेने राष्ट्रवादीशी आघाडीचा प्रस्ताव नाकारून वेगळे लढण्याचा प्रयत्न केला. परंतु, एकही जागा मिळाली नसल्याने काँग्रेसची वाताहत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

भाजपला ‘अच्छे दिन’ 
सन २०१२ ला झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची आघाडी होती. त्या वेळी राष्ट्रवादीला ११, काँग्रेसला ५, तर शिवाजीराव नाईक यांना १ जागा मिळाली होती. आता काँग्रेसला शून्य आणि भाजपला ६ जागा मिळाल्या. त्यामुळे येथे भाजपला चांगले दिवस आले आहेत. आता शिराळ्यात रणजितसिंह नाईक हे शिवाजीराव नाईक गटाचे किंगमेकर म्हणून भूमिका बजावणार आहेत.