उत्तर सोलापूर तालुक्‍यात आले शिरापूरचे पाणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मार्च 2017

अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज; अडथळ्यांची शर्यत केली पार, उरलेली कामे पूर्ण होण्याची आवश्‍यकता

सोलापूर - अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत शुक्रवारी शिरापूर उपसा सिंचन योजनेचे पाणी उत्तर सोलापूर तालुक्‍यात आले आहे. मागील आठवड्यापासून सीना नदीत पाणी असतानाही यांत्रिक विभागाच्या हलगर्जीपणामुळे ते वाया गेले होते. शुक्रवारी बीबी दारफळ येथील लोकमंगल साखर कारखान्याजवळ पाणी पोचले.

उजनी धरणाच्या पाण्यावर शिरापूर उपसा सिंचन योजना सुरू झाली आहे. डिसेंबर महिन्यात सोडलेल्या पाण्याद्वारे या योजनेची चाचणी केली होती. त्यानंतर कालपासून पुन्हा पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. सीना नदीत पाणी आल्यापासून ही योजना सुरू करावी, यासाठी काही शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसोबत वारंवार बैठका घेतल्या होत्या. मात्र, ठेकेदाराचे कारण सांगत पाणी सोडण्यास उशीर लावला जात होता. ‘देर आये दुरुस्त आये’ या उक्तीप्रमाणे उशीर का होईना पाणी आल्यामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. लोकमंगल कारखान्यापासून कालव्याच्या माध्यमातून हे पाणी मोहितेवाडी येथील टप्पा क्रमांक दोनमध्ये येणार आहे. त्यानंतर तेथील पंपाच्या सहायाने हे पाणी कालव्यातून वडाळा, नान्नज, गावडी दारफळ येथील पाझर तलाव भरण्यासाठी वापरण्यात येणार आहे. पाझर तलाव भरून घेतल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे.

पुढील कामासाठी घालावे लक्ष
शिरापूर उपसा सिंचन योजनेच्या उर्वरित कामासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी लक्ष घालण्याची मागणी तालुक्‍यातून होत आहे. या योजनेसाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन पुढील कामे करता येणार आहेत.