"जलयुक्त'मधील भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

कोल्हापूर - शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानात प्रचंड गैरव्यवहार झाला असून, या कामांची चौकशी करा. त्यात भ्रष्टाचार केलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित करा. चौकशीसाठी समिती नेमून जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांचे मार्गदर्शन घ्यावे, या मागण्यांचे निवेदन शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना गुरुवारी देण्यात आले. 

जलयुक्त शिवार राबवताना कृषी विभागाने मनमानी कारभार केला आहे. गावातील शेतकऱ्यांना, लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेतलेले नाही. दरवर्षी पाणीटंचाईचा होणारा आराखडा, भूजल पातळी याचा विचार झालेला नाही. ज्याठिकाणी माती नाला, सिमेंट बंधारा, छोटी तळी बांधण्यात आली, त्याठिकाणी पाणीसाठा झालेला नाही. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत या अभियानाबाबत दिलेली माहिती खोटी आहे. म्हणूनच या सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमावी. जिल्हा कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी व अभियानात भ्रष्टाचार केलेल्या इतर अधिकाऱ्यांना निलंबित करावे. जलयुक्त शिवार योजनेतील ज्या गावांत पाणी अडवले गेले नाही, याला जबाबदार असलेल्या ठेकेदारांकडून कामाची रक्कम वसूल करावी, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. 

जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात राजू यादव, विनोद खोत, रवी चौगुले, शशी बिडकर, राजू सांगावकर, सुनील पोवार, संभाजीराव भोकरे आदींचा समावेश होता. 

Web Title: Shiv Sena demands