रायगडावर सळसळणार शिवभक्तांचे एेक्य

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

कोल्हापूर - यंदा दुर्गराज रायगडावर राज्याभिषेक दिनाकरिता शिवभक्तांतील ऐक्‍य पाहायला मिळणार आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समिती, श्री शिवप्रतिष्ठान व शिवदिनोत्सव समितीचे लाखो कार्यकर्ते चार ते सात जूनदरम्यान एकत्र येऊन शिवप्रेमाची प्रचिती देणार आहेत. परस्परांच्या सहकार्यातून शिवराज्याभिषेक दिन सोहळा दिमाखदार पद्धतीने साजरा करण्याचा निर्धार शिवभक्तांनी केला आहे. 

खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीतर्फे ६ जूनला शिवराज्याभिषेक सोहळा होत आहे. समितीच्या कार्यकर्त्यांनी त्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. पाच जूनला होणाऱ्या गडपूजन, शिवकालीन युद्धकला, शाहिरी, व्याख्यान यांचे नियोजन सुरू आहे. सहा जूनला मुख्य सोहळ्याची तयारी केली जात आहे. 

शिवप्रतिष्ठानतर्फे संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली चार जूनला कार्यक्रम होत आहे. त्यासाठी शिवप्रतिष्ठानचे हजारो कार्यकर्ते डोक्‍यावर पांढरी टोपी, हातात काठी, पाठीला सॅक, हातात भगवे ध्वज घेऊन रायगडावर तीन जूनलाच मुक्काम ठोकणार आहेत. 

शिवदिनोत्सव समितीचा कार्यक्रम सात जूनला होणार असला तरी समितीचे कार्यकर्तेही तीन व चार जूनला गडावर दाखल होणार आहेत. 

दरवर्षी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीतर्फे होणाऱ्या सोहळ्याकरिता पाच लाखांवर शिवभक्त चार ते सहा जूनदरम्यान गडावर दाखल होऊन शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभागी होतात. यंदा तिन्ही संघटनांचे कार्यक्रम एकापाठोपाठ असल्याने सहा ते सात लाख शिवभक्तांची लगबग रायगड किल्ल्यासह पाचाड, रायगडवाडी, छत्री निजामपूर, हिरकणीवाडीमध्ये पाहायला मिळणार आहे. 

इतक्‍या मोठ्या प्रमाणात शिवभक्त येणार असून, तिन्ही समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व शिवभक्तांची सोय एकमेकांच्या सहकार्याने करण्याचा निर्धार केला आहे. विशेष म्हणजे यंदा गडावर मे अखेरपर्यंत पुरेल इतकेच पाणी उपलब्ध आहे. पाण्याची टंचाई शिवभक्तांना भासू नये, यासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शिवभक्तांना किमान तीन लिटर पाणी सोबत आणावे, असे आवाहन केले आहे. 

रायगड जिल्हा प्रशासनाबरोबर चर्चा करून गडावर येणाऱ्या युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक यांची सोय करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे. 

Web Title: shivrajyabhishek din sohala celebration on raigad