शिरोळमध्ये सेना-भाजपची दिलजमाई

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

शिरोळ - भाजप व स्वाभिमानी शेतकरी संघटनेची युती फिस्कटल्याने शिरोळ तालुक्‍यामध्ये स्वाभिमानी स्वबळावर निवडणुकीस सामोरे जाणार आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची आघाडी निश्‍चित असून भाजप-शिवसेना युती झाली आहे. या युतीमध्ये जनसुराज्य व आरपीआयला समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू आहेत. दरम्यान युतीबाबत आमदार उल्हास पाटील यांनी दुजोरा दिल्याने तालुक्‍यामध्ये तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

शिरोळ तालुक्‍यात जिल्हा परिषदेच्या 7 व पंचायत समितीच्या 14 जागा आहेत. पंचायत समितीवर स्वाभिमानीची सत्ता आहे. तसेच तालुक्‍यामध्ये जिल्हा परिषदेचे पाच सदस्य आहेत. गेल्या तीन महिन्यांत भाजपने तालुक्‍यात भूकंप घडवित बहुजन विकास आघाडी, राष्ट्रीय कॉंग्रेस व राष्ट्रवादीमधील मातब्बरांना पक्षात प्रवेश दिला. त्यांच्या प्रवेशामुळे भाजप व स्वाभिमानी शेतकरी संघटनेची युती होण्यात अडथळा निर्माण झाला आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेले मातब्बर हे स्वाभिमानीचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असल्याने त्यांच्याबरोबर युती करून निवडणूक लढविण्यास स्वाभिमानीच्या काही कार्यकर्त्यांचा सुरवातीपासूनच विरोध होता.

शुक्रवारी सायंकाळनंतर शिरोळ तालुक्‍यामध्ये स्थानिक पातळीवर भाजप व शिवसेनेची बोलणी झाली. यामध्ये शिवसेनेने धाकट्या भावाची भूमिका बजावण्याची तयारी दर्शविली. भाजप-शिवसेनेच्या युतीचा फॉर्म्युला निश्‍चित झाला असून जिल्हा परिषदेच्या चार जागा भाजपने व तीन जागा शिवसेनेने लढविण्याबाबत एकमत झाले. शिवसेनेकडे दत्तवाड, उदगाव व आलास आणि भाजपकडे शिरोळ, नांदणी, दानोळी व अब्दुललाट हे मतदारसंघ निश्‍चित झाले आहेत. दरम्यान कॉंग्रेस व राष्ट्रवादीमध्ये आघाडी झाली असून कॉंग्रेसकडे जि.प.च्या चार व राष्ट्रवादीकडे तीन जागा आणि पंचायत समितीकरिता प्रत्येकी सात जागा असा फॉर्म्युला निश्‍चित झाला असून रविवारी सकाळी उमेदवारांची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सर्जेराव शिंदे यांनी दिली.

महायुती करण्यासाठी खलबते
दरम्यान भाजप-शिवसेनेच्या युतीबाबत आमदार पाटील यांनी दुजोरा दिला आहे. पंचायत समितीकरिता भाजप-शिवसेना युतीमध्ये आरपीआय व जनसुराज्य शक्‍ती या घटक पक्षांना सामावून घेऊन महायुती करण्याबाबत खलबते सुरू आहेत. या राजकीय घडामोडींमुळे तालुक्‍यामध्ये तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.