शूटिंगचा यशस्वी वसगडे पॅटर्न!

वसगडे येथील हा वाडा चित्रिकरणासाठी निर्मात्यांना भुरळ घालतो आहे.
वसगडे येथील हा वाडा चित्रिकरणासाठी निर्मात्यांना भुरळ घालतो आहे.

अनेक अडचणींवर मात करून कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी चित्रीकरणाला आता पुन्हा वेग आला आहे. आउटडोअर चित्रीकरणावर भर दिला जात असून जिल्ह्यातील बंगले, फार्म हाउसना मागणी वाढली आहे. त्यातही करवीर तालुक्‍यातील वसगडे गावाने ‘शूटिंग हब’ म्हणून मिळवलेली लोकप्रियता उल्लेखनीय ठरते आहे. सध्या येथे एका दूरचित्रवाणी मालिकेचे चित्रीकरण सुरू असून त्यातून किमान ५० स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. त्याशिवाय एकूणच गावातील अर्थकारणाला बळ मिळाले आहे. 
 

एका बंगल्यात चित्रीकरणाचे किमान दहा दिवसांचे शेड्यूल ठरले तर केवळ भाड्यातून किमान एक लाखाचे उत्पन्न मिळते. सलग चित्रीकरण असेल तर महिन्याचे भाड्याचे पॅकेज वेगळे असते. शहर आणि परिसरात आता असे दहा ते बारा बंगले चित्रीकरणासाठी चांगले लोकेशन्स म्हणून निर्मात्यांच्या यादीत समाविष्ट झाले आहेत. वसगडे, सांगवडे, वडणगे, शिंगणापूर, प्रयाग चिखली, हणमंतवाडी, पंचगंगा घाट, राजाराम बंधारा यासारखी पारंपरिक लोकेशन्स आजही उपयुक्त ठरत असली तरी आता डोंगरकपाऱ्यांतील काही गावेही चांगली लोकेशन्स म्हणून पुढे येत आहेत. गारगोटी परिसरातील जकीनपेठ, पन्हाळ्याच्या पायथ्याची बुधवार पेठ, गगनबावड्यातील बावडेकर हवेली, वसगडेतील जुना वाडा, फुलेवाडीतील पाटलांचा बंगला, राधानगरीतील शिरगाव, कांबळवाडी, आवळी बुद्रुक, अणदूर, पळसंबे, असळज, निपाणीचा वाडा, आजऱ्यातील रामतीर्थ, कागल घाटगे सरकारांची विहीर, वारणा परिसरातील अनेक लोकेशन्सची आता मराठी निर्मात्यांना भुरळ पडली आहे; मात्र शहराशेजारचे गावपण जपलेले आणि चांगली लोकेशन्स उपलब्ध असल्याने वसगडेचा पॅटर्न अधिक यशस्वी ठरतो आहे.

वसगडेतील गाट यांचा वाडा आणि पाटील वाडा येथे सतत विविध चित्रपट, मालिकांसाठी चित्रीकरण होते. त्याशिवाय या वाड्यांसह शाळा, शेत मळा अशी विविध लोकेशन्सही येथे आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व प्रकारची पिके गावात घेतली जातात. त्यामुळे चित्रीकरणासाठी कुणाला फुलांचा मळा पाहिजे तर येथे फुलांचा मळा मिळतो. कुणाला विहीर पाहिजे तर विहीर मिळते आणि कुणाला गायींचा-म्हशींचा गोठा पाहिजे तर तोही येथे उपलब्ध आहे. मुळात एखाद्या गावात चित्रीकरण करायचे म्हटले तर बघ्यांची गर्दी हाच मोठा अडथळा असतो. मात्र ग्रामस्थांनी अगदी ठरवून चित्रीकरणाला कोणताही अडथळा येणार नाही, याची खबरदारी घेतली आहे. त्याशिवाय येणाऱ्या निर्मात्याला जितके सहकार्य करता येईल, तितके देण्याची सकारात्मक भूमिका घेतली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com