पंढरपूरमध्ये दुकानाला आग; एकाचा मृत्यू

अभय जोशी
शनिवार, 20 मे 2017

किशोर शंकरलाल सोमाणी यांचे पेट्रोल पंपालगत बांधकाम साहित्याचे दुकान आहे. या दुकानाच्या मागील जागेत उत्तर प्रदेशातील संतोष रामप्रताप किबार (वय 45 रा. फत्तेपूर) हा छापड्यांची खोकी गोळा करुन ती होलसेल मध्ये विकण्याचा व्यापार करत असे.

पंढरपूर - जुनी छापडी खोकी एकत्र केलेल्या एका दुकानाला आग लागून एकाचा मृत्यू झाला, तर शेजारील एका दुकानातील सात लाख रुपयांच्या वस्तू जळून सात लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना येथील महावीनगर भागात आज (शनिवार) पहाटेच्या सुमारास घडली.

या घटनेची पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, येथील किशोर शंकरलाल सोमाणी यांचे पेट्रोल पंपालगत बांधकाम साहित्याचे दुकान आहे. या दुकानाच्या मागील जागेत उत्तर प्रदेशातील संतोष रामप्रताप किबार (वय 45 रा. फत्तेपूर) हा छापड्यांची खोकी गोळा करुन ती होलसेल मध्ये विकण्याचा व्यापार करत असे. पहाटेच्या सुमारास तिथे गोळा करुन ठेवलेल्या खोक्‍यांना आग लागली. आगीची माहिती समजताच पोलिसांनी नगरपालिका अग्निशामक दल तसेच श्री विठ्ठल कारखान्यावरील अग्निशामक गाडीस बोलवून घेतले.

परंतु त्या दरम्यान किशोर सोमाणी यांच्या दुकानातील साहित्याने पेट घेऊन सुमारे सात लाख रुपयांचे नुकसान झाले. अग्निशामक दलाने आग आटोक्‍यात आणल्यानंतर छापड्यांची खोकी विकण्याचा व्यवसाय करणारा व्यापारी संतोष किबर याचा जळालेला मृतदेह पोलिसांना सापडला. या प्रकरणी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून फौजदार निलेश गोपाळचावडीकर पुढील तपास करीत आहेत.