वर्षभर असते गडकोटांचे महत्त्व, एकाच दिवशी गर्दी करणे टाळावे! 

fort
fort

सोलापूर - कोणत्याही गडकोटाचे छायाचित्र, व्हिडीओ आपल्यासमोर आले की अपसूकच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आपल्या तोंडून निघते. महाराजांमुळे गडकोटांना मानाचे स्थान मिळाले आहे. अलीकडे गडकोटांवर भ्रमंतीचे प्रमाण वाढत असून, जयंती किंवा अन्य विशेष दिनाला तर हजारो, लाखोंच्या संख्येने शिवभक्त गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे. वर्षभरच गडकोटांचे महत्त्व असते. शिवभक्त, ट्रेकर्सनी एकाच दिवशी गर्दी करणे टाळावे, असे मत गडकोटप्रेमींतून व्यक्त होत आहे. 

शिवराज्याभिषेक दिनी रायगडावर देशभरातून शिवभक्तांची उपस्थिती होती. मुख्य कार्यक्रमानंतर गडावरून खाली उतरत असताना दगड अंगावर कोसळल्याने अशोक उंबरे (वय 19, रा. उळूप, ता. भूम, जि. उस्मानाबाद) या शिवभक्ताचा मृत्यू झाला. तर सोलापूरच्या मंदा मोरे (वय 45) यांच्यासह अनेकजण जखमी झाले. गडाच्या महादरवाजाजवळ अरुंद वाटेमुळे गोंधळ उडाल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. 

शिवरायांच्या जीवनातील अनेक दिवस महत्त्वाचे आहे. शिवभक्तीचे आकर्षणही वाढत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, पुण्यतिथी यासह विशेष दिनाला गडकोटांवर गर्दी वाढत आहे. आम्ही गर्दीच्या दिवशी गडकोटांवर जाणे टाळतो. जयंती किंवा अन्य दिवसानिमित्त आधी किंवा नंतरही जाता येते. अमरनाथला ज्या पद्धतीने नोंदणी करून वर पाठविले जाते त्याप्रमाणे रायगडासह अन्य ठिकाणी करावे, अशी भावना गडकोटप्रेमी महेश धाराशिवकर यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेकदिनी अपघात झाला. वाईट झाले. एकाचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले. शिवभक्तांनी आपल्या जवळच्या किल्ल्यावर शिवजयंती, महाराजांचा राज्याभिषेक दिवस साजरा करावा. भावनेच्या भरात एकाच ठिकाणी गर्दी करणे टाळावे. गर्दीमुळे येथील व्यवस्थेवर ताण येतो.
- चंद्रशेखर शेळके, 
सदस्य, गडकोट संवर्धन समिती

रायगडासह इतर गडकोटांची आता पूर्वीसारखी दुर्गमता राहिली आहे. शिवभक्तांनी एकाच दिवशी गर्दी करू नये. कार्यक्रम आयोजकांनी गर्दीची विभागणी करावी. जयंती किंवा अन्य विशेष दिवसाशिवाय त्या स्थानाचे महत्त्व असतेच, त्यामुळे गर्दीच्या दिवशी गडकोटांवर जाणे टाळावे. 
- महेश धाराशिवकर, गडकोटप्रेमी 

गडकोटांवर जाणाऱ्यांनी शिस्तीचे पालन करावे. हुल्लडबाजी करू नये. रायगडावर दरवाजा बंद झाल्याने दुसरीकडून उतरण्याची घाई शिवभक्तांनी केली. दिवसाचे महत्त्व आहे म्हणूनच लोक गडकोटांवर गर्दी करतात. पण प्रत्येकाने सुरक्षेची काळजी घ्यावी. 
- अमोल मोहिते, कार्याध्यक्ष, हिंदवी परिवार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com