स्वामी तिन्ही जगाचा ‘चिल्लर’विना भिकारी

स्वामी तिन्ही जगाचा ‘चिल्लर’विना भिकारी

सर्वसामान्य माणूस एकदमच चर्चेत आला आहे. देशभरातही आणि साताऱ्यातही. नोटाबंदीमुळे देशात सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू बनून गेला आहे, तर साताऱ्यातील राजकीय रणधुमाळीत सर्वसामान्य माणसाला महत्त्व मिळू लागले आहे. नोटाबंदीमुळे त्याला त्रासही झाला; पण तरीही तो सहन करतोय. काही दिवसांनंतर परिस्थिती सुधारणार या आशेवर रांगांतून पुढे सरकतोय. मनोमिलनाच्या राजकारणात कोंडमारा झालेल्या साताऱ्यातील सर्वसामान्य माणसाला पर्यायही मिळण्याची शक्‍यता पुढे येऊ लागली आहे. काही काळापुरती का होईना सर्वसामान्य माणसाची किंमत वधारली, हेही ठीकच. ती कायमस्वरूपी वाढून सर्वसामान्यांची भरभराट व्हायला हवी, असेच काही तरी घडायला हवे. राजकीय, आर्थिक, सामाजिकदृष्ट्या सर्वसामान्य माणसाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, हे खरे आहे.  

आठवडाभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० व एक हजाराच्या नोटांवर बंदी घातली आणि एकच भूकंप झाला. काही तासांत सारे चित्रच बदलून गेले. सर्वसामान्य माणसाला अस्वस्थतेसह दिलासा मिळाला. तो अस्वस्थ झालाच. कारण रोजचे किरकोळ व्यवहार करणेही त्याला जिकिरीचे होणार होते; पण त्याच्यापेक्षाही अधिक अस्वस्थ झालेले घटक वेगळेच होते.

सर्वसामान्य माणसावर या निर्णयाचा फारसा आघात होणार नव्हता; पण इतर घटकांना मात्र चुटपूट होती. अतिरिक्त नोटांचा प्रश्‍न त्याला झोप लागू देणार नव्हता. कर नाही त्याला डर कशाला, या उक्तीप्रमाणे सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळत होता. बॅंकांपुढे आणि एटीएमसाठी लागणाऱ्या रांगामुळे तो त्रासत होता, तरीही मनातून तो खूष होता. स्वतःला होणाऱ्या दुःखापेक्षा कधीकधी इतरांना होणारा त्रास त्याला बरा वाटतो; तसेच काही तरी झाले होते. कामधंदा नाही, व्यवसाय नाही पण एैश करणारे अनेक जण त्याला अवतीभवती दिसत होते. त्यांच्याकडे दिसणाऱ्या उंची वस्तू, महागड्या गाड्या फिरवत पैशांच्या जीवावर मस्ती करणारे त्याला खुपत होते. सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता याचे चक्र सुरूच होते. ज्याने कष्टाने, मेहनतीने इमले उभे केले. त्यांना त्याची सहानुभूती जरूर होती; परंतु केवळ पैसा हेच भांडवल मानून लोकांवर रुबाब जमविणाऱ्यांना चाप बसणार, ही कल्पनाच सर्वसामान्य माणसाला सुखावून जात होती. सोशल मीडिया आणि माध्यमातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत होत्या, तरीही त्या सर्व चर्चेचा केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूसच राहिला. बॅंकांपुढच्या आणि एटीएमपुढच्या रांगा कमी होतील, त्या वेळीच या सर्वसामान्य माणसाला अधिक दिलासा मिळणार हे खरे आहे. त्यानंतर काळ्या पैशांचे काय होणार आहे, याचे कोडे उलगडण्याची वाट तो पाहणार आहे. एका बाजूला प्रचंड श्रीमंती आणि दुसऱ्या बाजूला दारिद्य्र, अशा विषमतेला सुरुंग लागणार की नाही, हे काळ ठरविणार आहे. त्यातून योग्य पद्धतीने ऑनलाइन व्यवहार करण्याचे शहाणपण त्याला लाभावे आणि स्वच्छ पारदर्शक आर्थिक वर्तनाची सवय वृद्धिंगत व्हावी आणि सर्वसामानंयाच्या सार्वजनिक जगण्याला हातभार मिळावा, एवढे साध्य झाले तरी खूप काही होईल.

देशपातळीवर सर्वसामान्यांना आर्थिक शिस्त लागणार की नाही, हे या निर्णयाचे फलित असेल की नाही, याबाबत अजून निश्‍चित दिशा नाही. साताऱ्यात सर्वसामान्यांची स्थिती तशीच असावी. इथे सर्वसामान्यांना मिळालेले महत्त्व नगरपालिकांच्या निवडणुकीमुळे आहे. जिल्ह्यातील आठ पालिका आणि सहा नगरपंचायतींची रणधुमाळी रंगात आली आहे. त्यातही सातारा शहरातील रंग अधिकच गहिरे होत चालले आहेत. देशातील ‘जनते’पुढे आर्थिक स्थैर्याचा प्रश्‍न आहे, तर साताऱ्यातील ‘रयते’पुढे समतोल राजकीय स्थैर्याचा. इथल्या राजकारणावर राजघराण्याचा अंकुश आहे. त्यामुळे सर्वसामान्याला मोठ्या पदाची संधी मिळणे दुरापास्तच राहते. सर्वसामान्यांनी शहराच्या विकासाबाबत किंवा स्थित्यंतराबाबत काही निर्णय घ्यावा इतका मोकळेपणा त्याला कधी मिळत नाही. त्याने काही निर्णय घेऊन काही करायचे ठरविले तर तो हाणून कसा पाडायचा याचीही व्यवस्था इथे होत असते. राजघराण्याच्या समर्थकांच्या दोन गटांशिवाय तिसरा कोणीही वरचढ ठरणार नाही, अशी या शहराची मानसिकता आहे.

दहा वर्षांपूर्वी राजघराण्यातील दोन गटांमध्ये लढती होत होत्या. कोणीही सत्तास्थानी आले तरी सुत्रे राजघराण्याकडूनच हलविली जायची. गेल्या दहा वर्षांत मनोमिलनाने दोन्ही गट एकत्रितरीत्या सत्तेत होते. त्यामुळे शहराच्या विकासाबाबत ना लोकप्रतिनिधींना तळमळ होती ना सत्तेची सुत्रे हलविणाऱ्यांना. कोणतीही दाद न मागता जे चाललेय ते शांतपणे पाहण्याखेरीज रयतेच्या हाती काही उरलेच नव्हते. सत्तेत असणाऱ्या लोकप्रतिनिधींपैकी अनेक बिनविरोधही होते. त्यामुळे मस्ती, रूबाब, उर्मटपणा, उद्दामपणा, फळकुटगिरी, दहशत असे सत्तेभोवती फिरणारे सारे शब्द इथे एकवटले होते. रयत निमूटपणे पाहत होती. निवडणूक येण्याची वाट बघत होती; पण मनोमिलन विसकटले आणि पुन्हा सत्ता ताब्यात ठेवण्याचा राजमार्ग मोकळा झाला. राजघराण्याच्या दोन्ही गटांत संघर्ष सुरू झाला. लढत चुरशीची होईलही; पण सत्तेचा अंकुश मात्र राजघराण्याकडेच राहील, यात शंका नाही, तरीही सर्वसामान्यांना महत्त्व देण्याचे राजकारण करणे सर्वांनाच भाग पडत आहे, हेही लक्षात घेण्यासारखे आहे.

सर्वसामान्यांना पदे देण्यावरून मोठा ऊहापोह होत आहे. निवडणुकीच्या काळात अशी भाषा असणे साहजिक आहे. निवडणुकीनंतरही सर्वसामान्यांना तसाच सन्मान मिळण्याची अपेक्षा तरी त्यानिमित्ताने व्यक्त होऊ लागली आहे.

नोटाबंदीनंतर देशात सुट्ट्या पैशांचा प्रश्‍न निर्माण झाला. शंभरच्या नोटेला महत्त्व प्राप्त झाले. जुन्या मोठ्या नोटा मोडून चिल्लर गोळा करण्यासाठी खटाटोपी सुरू झाल्या. साताऱ्यात हे चित्र आहेच. शंभरच्या नोटेप्रमाणे साताऱ्याच्या सर्वसामान्यांनाही विचारले जाऊ लागले. चिल्लरप्रमाणेच एकेका मतांसाठी जिवाचे रान होऊ लागले आहे. भरूपर जुन्या नोटा आहेत, मानसन्मान आहे, प्रतिष्ठा आहे; पण पैशाविना काही करता येत नाही, अशी अवस्था राजकारणातीलच नव्हे, तर विविध क्षेत्रांतील अनेक मातब्बरांची झाली आहे. तशीच अवस्था निवडणूक रिंगणातील उमेदवारांचीही आहे. सर्व काही आहे, काहीही करू शकण्याची ताकद आहे. तरीही एकेक मत कसे खेचून आणायचे, याची मात्र चिंता आहे. ‘आई’पेक्षा जगात काहीही महत्त्वाचे नसते; पण स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, या म्हणीप्रमाणे स्वामी तिन्ही जगाचा ‘चिल्लर’विना भिकारी असे म्हणण्याची वेळ मात्र अनेकांवर आली आहे, हे खरे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com