सलाम... वाघिणीच्या काळजाच्या जिगरबाज स्वातींना! 

रविवार, 10 सप्टेंबर 2017

कर्नल संतोष महाडिक. काश्‍मीरमध्ये 17 नोव्हेंबर 2015 रोजी दहशतवाद्यांचा खात्मा करताना हुतात्मा झाले. सातारा तालुक्‍यातील पोगरवाडी या छोट्या गावातील संतोष यांच्या हौतात्म्याने अवघ्या महाराष्ट्राच्या एका डोळ्यात पाणी होते, तर दुसऱ्या डोळ्यात अभिमान होता. सैनिक स्कूलमध्ये शिक्षण घेतलेल्या संतोष यांच्या शौर्याची गाथा ऐकून प्रत्येकाची छाती गर्वाने फुलत होती. सातारा जिल्ह्यात शोकाकूल वातावरणातही संतोष यांच्या पराक्रमाला प्रत्येक जण सलाम करीत होता.

आपले दुःख, भावना बाजूला ठेवून करारी धाडसाने एखादे ध्येय गाठणे महाकठीण ठरते. मनातील जिगर जिवंत असेल तरच ते शक्‍य होते. आपल्या आयुष्यात कशाला महत्त्व द्यायचे ते प्रत्येकाने ठरवायचे असते. भावना महत्त्वाच्या, की कर्तव्य असा प्रश्‍न अनेकांना अनेकदा पडत असतो. अनेकांची वाटचाल भावनेच्या आधारे होते. कर्तव्याला महत्त्व देणारे वेगळे ठरतात. लेफ्टनंट स्वाती महाडिक यांची कृती म्हणजे अशा वेगळ्या जिद्दीची अमोल कहाणी आहे. हुतात्मा पतीचे अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी, दहशतवादाशी झुंज देण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत. स्वाती यांच्या रूपाने सैन्य दलाला महिला अधिकारी देऊन सातारा जिल्ह्याच्या मातीने शौर्याची भूमी असल्याचे सिद्ध केले आहे. 

कर्नल संतोष महाडिक. काश्‍मीरमध्ये 17 नोव्हेंबर 2015 रोजी दहशतवाद्यांचा खात्मा करताना हुतात्मा झाले. सातारा तालुक्‍यातील पोगरवाडी या छोट्या गावातील संतोष यांच्या हौतात्म्याने अवघ्या महाराष्ट्राच्या एका डोळ्यात पाणी होते, तर दुसऱ्या डोळ्यात अभिमान होता. सैनिक स्कूलमध्ये शिक्षण घेतलेल्या संतोष यांच्या शौर्याची गाथा ऐकून प्रत्येकाची छाती गर्वाने फुलत होती. सातारा जिल्ह्यात शोकाकूल वातावरणातही संतोष यांच्या पराक्रमाला प्रत्येक जण सलाम करीत होता.

पोगरवाडीच्या मातीत संतोष यांना अखेरची मानवंदना दिली जात असताना अवघा सह्याद्रीही गहिवरला होता. त्याच वेळी आपल्या प्रिय व्यक्तीला निरोप देताना संतोष यांच्या पत्नी स्वाती, मुलगा- मुलगी आणि आई, भाऊ, बहिणीसह कुटुंबीय दुःखाच्या आवेगात विमनस्क होते. त्याही स्थितीत स्वाती यांच्या मनात काही वेगळेच चालले होते. त्यांच्या मनातील जिद्द त्यांना अस्वस्थ करीत होती. मनात दुःखाचा सागर असतानाही दुसऱ्या बाजूला देशप्रेमाने भारलेला विचार त्यांना प्रेरित करीत होता. त्याच वेळी त्यांनी "आपणही सैन्यात अधिकारी होऊन देशाच्या सेवेसाठी योगदान देणार आहे,' असे जाहीर केले. पती हुतात्मा झाल्यानंतर अशा प्रकारचे धैर्य दाखविणे केवळ असामान्यच होते. 

पदवीधर झाल्यानंतर शिक्षिका म्हणून विद्यार्थी घडविणारे स्वाती यांचे हात आता दहशतवाद्यांशी लढण्यासाठी प्रशिक्षित झाले आहेत. भावनांना थारा न देता आपल्या कर्तव्यपूर्तीसाठी तत्पर असणारे मन करारीच असावे लागते. स्वाती यांच्या मनात देशाविषयी, समाजाविषयी अशाच कृतिशील विचारांची ज्योत पेटलेली होती. भरतगाव हे स्वाती यांचे माहेर. संतोष यांच्यासमवेत सुटीसाठी गावी आल्यावरही त्यांच्या मनातील सामाजिक बांधिलकी त्यांनी कृतीतून दाखवली होती. ग्रामस्वच्छता अभियानाच्या काळात जनजागरणाच्या कामातही त्यांनी सहभाग घेतला होता.

वृक्षांच्या संवर्धनापासून ते महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी दिलेली व्याख्याने आजही अनेकांना आठवतात. स्वतंत्र बाणा आणि विचाराने कृती करण्याची जणू सवयच त्यांनी लावून घेतली होती. काश्‍मीरमध्ये असताना पती संतोष यांच्या दहशतवाद्यांमध्ये सदभावना निर्माण करण्याच्या कार्यात स्वाती यांचाही पुढाकार होता. स्वाती यांचे काळीज एखाद्या वाघिणीसारखे होते. त्यामुळेच पतीच्या हौतात्म्यानंतर दुःखाला बाजूला सारत शौर्याला भिडण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. 

पतीला निरोप देताना केलेल्या निश्‍चयाला मूर्त रूपात आणणे सहजासहजी शक्‍य नव्हते. सैन्य दलात प्रवेश करण्यासाठी आवश्‍यक बाबींची पूर्तता करायला हवी होती. त्यासाठी संघर्ष करणे भाग होते. सैन्यात भरती होणे तेही अधिकारी म्हणून; भल्याभल्यांपुढे ते आव्हानच असते; पण स्वाती यांच्या मनातील जिगर केवळ वाखाणण्यासारखीच आहे. खंबीर मनाने स्वतःला, आपल्या कुटुंबीयांना सावरत धीर देत त्यांनी आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली. संतोष यांच्यासमवेत राहिल्यामुळे लष्करी वातावरणाची आवड त्यांना होती. आपल्या पतीचे अपुरे राहिलेले कार्य पूर्ण करायचेच हा संकल्प त्यांनी वेळोवेळी बोलून दाखविला. तो कृतीत आणण्यासाठी त्यांनी जिद्दीने प्रयत्नांची शर्थ केली. सैन्य दलानेही त्यांना अधिकारी होण्यासाठी संधी दिली. अगदी झाशीच्या राणीची आठवण यावी, अशीच प्रेरणा स्वाती यांनी दिली. आपल्या स्वराज आणि कार्तिकी या दोन्ही प्रिय अपत्यांना दूर ठेवतच त्यांनी 2016 मध्ये चैन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग ऍकॅडमीत प्रशिक्षणासाठी पाऊल ठेवले. अकरा महिन्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर त्या आज (शनिवारी) लेफ्टनंटपदाची शपथ घेऊन लष्कराच्या सेवेत दाखल होत आहेत. देहूरोड येथे त्यांना पहिले पोस्टिंग मिळाले आहे. सेना आयुद्ध कोर (आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प) मध्ये त्या अधिकारी होणार आहेत. 

स्वाती यांची जिगर लक्षात घेता दहशतवाद्यांना नमविण्यासाठी आणि देशसेवा करताना संतोष यांच्या कार्याची पूर्तता करण्यासाठी त्या बाजी लावून खिंड लढवतील, असा विश्‍वास सर्वांनाच वाटतो. या वीरपत्नीचा आदर्श केवळ महिलांच नव्हे तर पुरुषांसह साऱ्या समाजासमोरच अनुकरणीय ठरणार आहे. वाघिणीचे काळीज असणाऱ्या या जिगरबाज मर्दानीला- रणरागिणीला फक्त सलामच!