जाणिवेचे नाते रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ 

shripal-sabnis
shripal-sabnis

कोल्हापूर - ""विवेकी मानवतावादी भूमिका घेऊन ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांनी मार्क्‍सवाद उभा केला. त्यांच्या विवेकी कार्याच्या छटा घेऊन फोटोग्राफी व चरित्र लेखनाद्वारे "कष्टणाऱ्यांचा बाप' पुस्तकात मांडल्या आहेत. जाणिवेचे नाते रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ असते, याची प्रचिती या पुस्तकाने दिली,'' असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी आज येथे व्यक्त केले.

शाहू स्मारक भवनात मिलिंद यादव यांनी लेखन-छायाचित्रण केलेल्या "कष्टणाऱ्यांचा बाप' या पुस्तकाचे प्रकाशन श्री. सबनीस यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व डी. बी. पाटील अध्यक्षस्थानी होते. "हुतात्म्यांची परंपरा आणि भारताचे भवितव्य' विषयावर श्री. सबनीस यांचे व्याख्यान झाले. 
श्री. सबनीस म्हणाले, ""हिंसा म्हणजे कम्युनिस्ट असा गैरसमज पसरला होता. तो पुसण्याचे काम करीत विवेकवादी भारतीय कम्युनिस्ट असे शास्त्रीय मानवतावादी प्रगल्भ मॉडेल पानसरे यांनी तयार केले. त्यांच्या भावछटा विविध प्रसंगरूपाने मिलिंद यांनी पुस्तकात सुरेखपणे मांडल्या आहेत. हे पुस्तक काळजातून आले आहे. ऍड. पानसरे या चरित्र नायकाशी ती एकरूप होताना समतोलही साधला आहे.'' 

ते म्हणाले, ""देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अनेकांनी हौतात्म्य पत्करले. यात कम्युनिस्ट, आंबडेकरवादी, आदिवासी, मुस्लिमांसह अन्य घटकही होते. त्यांचे बलिदान टाळता येणार नाही. नव्या काळातील अन्य जातीतील व्यक्तीही संशोधनात्मक पातळीवर आपापल्या समाजातील हौतात्म्य झालेल्यांचे संदर्भ लोकांपुढे मांडत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्य दलात असे अनेक जाती धर्मातील मावळे होते. त्यांचे योगदानही इतिहासात दडले गेले. पण पानसरे यांनी "शिवाजी कोण होता' या पुस्तकाद्वारे ते पुढे आणले.'' 

लेखक मिलिंद यादव म्हणाले, ""लढण्याचे बळ मला अण्णांकडून मिळाले. पक्षासाठी घरदार बाजूला ठेवून ते कष्टकऱ्यांसाठी लढत राहिले. त्यांच्या अनेक छटा आठवणींच्या रूपात होत्या. त्या पुस्तकातून आल्या आहेत.'' 

रघुनाथ कांबळे यांनी स्वागत केले. या वेळी प्रा. राजेंद्र हारूगडे, अभय बकरे, मिलिंद यादव उपस्थित होते. 

अध्यक्षाला धमकी खेदजनक 
""सकाळी फिरायला जात जा, अशी धमकी मला दिली. मी फिरायला गेलो, मी कोणाला घाबरत नाही. पण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाला पोलिस बंदोबस्तात फिरावे लागते, ही बाब खेदजनक आहे'', असे सांगून श्री. सबनीस यांनी माणसातील माणूसपणाचा भाव वाढीस लागावा, शांतता नांदावी यासाठी संत वाङ्‌मयापासून सर्व जाती धर्मातील तत्त्वज्ञानांचा वापर आचरणात यायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com