'सत्यम्‌ सत्यम्‌.. उच्चारताच' झाला अक्षतांचा वर्षाव

सोलापूर - ग्रामदैवत सिद्धेश्‍वर महाराजांच्या योगदंडाचा अक्षता सोहळा शुक्रवारी संमती परिसरात झाला. त्या वेळी अक्षतांचा वर्षाव करताना भाविक.
सोलापूर - ग्रामदैवत सिद्धेश्‍वर महाराजांच्या योगदंडाचा अक्षता सोहळा शुक्रवारी संमती परिसरात झाला. त्या वेळी अक्षतांचा वर्षाव करताना भाविक.

सोलापूर - रंगीबेरंगी फुलांनी मांडवासारखा सजलेला संमतीकट्टा, तालात वाजणारा सनई चौघडा, ना पत्रिका ना कोणाचे बोलावणे तरीही उत्साहाने जमलेली लाखोंची गर्दी. सर्वांच्याच मुखात ओम सिद्धरामाय नम:शिवायचा जप. पांढऱ्या शुभ्र बाराबंदीतल्या मानकऱ्यांची लगबग. "एकदा भक्तलिंग हर्र.. बोला हर्र.., शिवयोगी सिद्धेश्‍वर महाराज की जय'चा जयघोष आणि सत्यम्‌ सत्यम्‌.. दिड्डम.. दिड्डमचा उच्चार आणि चारही बाजूंनी पडलेल्या अक्षता हे चित्र होते ग्रामदैवत सिद्धेश्‍वर महाराजांच्या योगदंडाचा कुंभारकन्येशी शुक्रवारी लागलेल्या सोहळ्याचे.

नंदिध्वजाच्या मार्गाकडे डोळे लावून बसलेल्या भाविकांचे चेहरे दुपारी दीडच्या सुमारास आनंदाने खुलले. पंचरंगी ध्वजासह सातही मानाच्या नंदिध्वजांचे आगमन झाल्यानंतर प्रत्येकाने नमन केले. पारंपरिक वाद्यासह नाशिक ढोलच्या दणदणाटाने वातावरणात अधिकच उत्साह संचारला होता. पांढऱ्या शुभ्र बाराबंदीतल्या भाविकांची लाट संमती कट्ट्याच्या दिशेने आली. डौलाने संमती कट्ट्याकडे येणाऱ्या नंदिध्वजांना मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी उपस्थितांची धडपड सुरू होती. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून पोलिसांनी मुख्य मार्ग बंद केला होता.

यात्रेत दोन वर्षांच्या चिमुकलीपासून 80 वर्षांच्या आजोबापर्यंत सगळ्यांच्या मुखात एकदा भक्तलिंग हर्र.. बोला हर्र.., शिवयोगी सिद्धेश्‍वर महाराज की जयच्या जयघोषांनी आसमंत दुमदुमून गेला होता.

नंदिध्वजांच्या आगमनानंतर हिरेहब्बू सिद्धेश्‍वर महाराजांच्या पूजेसाठी मंदिरात गेले. संमती कट्ट्यावर विवाह सोहळ्याची तयारी पूर्ण झाली होती. पूजा करून परत आल्यानंतर हिरेहब्बूंनी यात्रेची थोडक्‍यात माहिती सांगितली. त्यानंतर संमती वाचन सुरू झाले. प्रत्येक कडव्याच्या शेवटी "सत्यम्‌...सत्यम्‌....' उच्चारताच अक्षतांसाठी लाखो भाविकांचे हात उंचावले.

जवळपास दहा मिनिटे अक्षता सोहळ्याचा कार्यक्रम चालला. एकाच वेळी लाखो हातांनी पडणाऱ्या अक्षतांचा हा सोहळा जणू डोळे दीपवणारा ठरला. अक्षता सोहळ्याला महापौर प्रा. सुशीला आबुटे, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार शरद बनसोडे, आमदार प्रणिती शिंदे, आमदार प्रशांत परिचारक, सिद्धेश्‍वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी आदी उपस्थित होते.

क्षणचित्रे -
- दुपारी दीड वाजता नंदिध्वजांचे आगमन.
- दुपारी दोन वाजता अक्षता सोहळा.
- भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
- महापालिकेने फलक लावून केली मतदान जनजागृती
- गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ठेवली चोरट्यांवर नजर
- लाखोंच्या गर्दीवर दहशतवादविरोधी पथकाचे लक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com