साधे आणि प्रेमळ वागणे हीच इस्लामची बुनियाद - शहर काझी अमजदअली काझी

solapur
solapur

सोलापूर : रमजानच्या महिन्यात आपण ज्याप्रमाणे वागतो, त्याप्रमाणेच कायम राहण्याचा प्रयत्न करा. एकमेकांशी प्रेमाने रहा. आपल्या वागण्यामुळे जर इतरांना त्रास होत असेल तर वाईट आहे. आपले बोलणे, राहणे, वागणे साधे आणि प्रेमळ असायला हवे असे सांगताना हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन देशाच्या प्रगतीमध्ये योगदान द्यावे अशी अपेक्षा शहर काझी अमजदअली काझी यांनी शनिवारी व्यक्त केली. होटगी रस्त्यावरील अलमगीर ईदगाह मैदानावर रमजान ईदनिमित्त सामूहिक नमाज पठण करण्यात आले. यावेळी शहर काझी बोलत होते. 

घराघरांत आनंदाचे वातावरण, गोडवा राहावा यासाठी शिरकुर्मा व अन्य गोड पदार्थ बनविले जातात असे सांगून शहर काझी अमजदअली काझी म्हणाले, अल्लाह सोबतच आपले नाते अधिक दृढ व्हावे यासाठी प्रयत्न करा. जगात कोठेही अन्याय, अत्याचार होत असेल तर सर्वांनी एकत्र येऊन लढा द्यायला हवा. खरा मुसलमान व्हायचे असेल तर जे स्वतःला हवे आहे तेच इतरांनीही मिळावे यासाठी प्रयत्न करा असा संदेशही त्यांनी यावेळी दिला. अडचणीच्या काळात एकमेकांच्या मदतीसाठी पुढे या. जर कोणी पुढे जात असेल तर त्याची निंदा करू नका, आनंद व्यक्त करा. 

प्रार्थनेच्यावतीने शहर काझी यांनी सुमामाची गोष्ट सांगितली. छोट्या छोट्या कारणावरून घरात, समाजात कोठेही वाद घालू नका. इतरांच्या प्रगतीने जळू नका. मुस्लिमांकडे पाहताना नजर बदलली जाऊ नये असे वागा. गेल्या महिन्याभरात तुम्ही रमजानचे रोजे करताना जसे वागलात तसेच कायम रहा. गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन करताना दहशतवाद्यांचा नाश कर, सर्वत्र शांती राहूदे. हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये असेच अमन राहू दे अशी प्रार्थना सर्वांनी अल्लाहकडे केली. 

सामूहिक नमाज पठण असल्याने पोलिसांनी ईदगाह मैदान परिसरातील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविली होती. सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नमाज अदा करून परत जाताना मुस्लिम बांधवांनी गोरगरिबांना दान केले. 

आनंदी वातावरणात ईदच्या शुभेच्छा.. 
पोलिस आयुक्तालयाच्यावतीने जातीय सलोखा उपक्रमांतर्गत अलमगीर ईदगाह परिसरात पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी गुलाबाचे फूल देवून मुस्मिल बांधवांना रमाजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलिस उपायुक्त अपर्णा गिते, सहायक पोलिस आयुक्त महावीर सकळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरसिंग अंकुशकर यांच्यासह हिंदू-मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते. पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गळाभेट घेऊन मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. 

शहर काझी म्हणाले.. 
- कुराणमध्ये सांगितल्याप्रमाणे वागा. 
- कुराणला आपल्या हृदयमध्ये ठेवा. 
- एकमेकांची इज्जत करा, आनंदाने रहा. 
- ज्याचे विचार चांगले तोच खरा मुसलमान. 
- अडचणीचा सामना करायला सदैव तयार रहा. 
- राष्ट्रीय एकात्मता कायम राहण्यासाठी प्रयत्न करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com