गाव नव्हे, तर तालुका होणार दुष्काळी! 

गाव नव्हे, तर तालुका होणार दुष्काळी! 

सातारा - चार आठवड्यांपेक्षा अधिक काळ पावसाने खंड दिलेल्या तालुक्‍यांत दुष्काळ जाहीर करून तेथे टंचाईच्या उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सहा तालुक्‍यांचा दुष्काळी म्हणून समावेश केला असून, या तालुक्‍यांत गावनिहाय सर्व्हे करून तेथील नेमक्‍या परिस्थितीची माहिती घेतली जात आहे. मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत या तालुक्‍यांत करायच्या उपाययोजनांसंबंधी निर्णय होणार आहे. 

केंद्र शासनाने दुष्काळाचे निकष बदलले आहेत. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील सहा तालुके दुष्काळी म्हणून गृहीत धरून शासनाने सर्वेक्षण सुरू केले आहे. केंद्र सरकारच्या निकषानुसार कऱ्हाड, फलटण, खंडाळा, वाई, माण, कोरेगाव या सहा तालुक्‍यांचा समावेश आहे. दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 व या संदर्भातील शासन निर्णयानुसार दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी शासनाने कार्यपद्धती निश्‍चित केली आहे. त्यानुसार "ट्रिगर दोन' लागू झालेल्या 172 तालुक्‍यांत क्षेत्रीय स्तरावर ग्राउंड टु थिंगची कार्यवाही शासनाने हाती घेतली आहे. 

यंदाच्या खरीप हंगामात सप्टेंबरअखेर करण्यात आलेल्या मूल्यांकनानुसार राज्यातील 172 तालुक्‍यांत ट्रिगर दोन लागू आहे. या तालुक्‍यांतील दहा टक्के गावे मोघम पद्धतीने निवडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात येत आहे. पावसाचा पडलेला खंड हा पहिला निकष असून रिमोट सेन्सिंगद्वारे फोटो इंडेक्‍स तयार करून त्यावरून निर्णय घेतला जाणार आहे. भूगर्भातील पाणी पातळीच्या आधारेही दुष्काळाची तीव्रता ठरविली जाणार आहे. आता या निकषानुसार सध्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकताच माण, खटाव तालुक्‍यांचा पाहणी दौरा केला आहे. पालकमंत्री विजय शिवतारे हेही खंडाळा, फलटण आणि कोरेगाव या तीन तालुक्‍यांचा पाहणी दौरा करणार आहेत. 

जे तालुके दुष्काळी म्हणून जाहीर होतील, त्यांना आठ ते नऊ सवलती दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये मुलांचे शैक्षणिक शुल्क माफी, वीजबिल माफी, अन्नधान्य तुटवडा असल्यास शासनाकडून अन्नधान्य पुरविणे आदी सवलतींचा समावेश आहे. सर्वेक्षणातून खरीप हंगामातील परिस्थिती जाणून घेऊन येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळी मदतीसाठी निर्णय होणार आहे. यापूर्वी कृषी विभागाचे अधिकारी गावागावांत जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती जमा करून ती शासनाला सादर करणार आहेत. 

जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी तालुके 
कऱ्हाड, फलटण, खंडाळा, वाई, माण, कोरेगाव 

दुष्काळ ठरविण्याचे शासनाचे निकष 
- चार आठवडे पावसाचा खंड 
- रिमोर्ट सेन्सिंग फोटोग्राफी 
- भूगर्भातील पाण्याची पातळी 
- खरीप हंगामातील पीक परिस्थिती 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com