माफिया शिरजोर... राजकीय वरदहस्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

सांगली - जिल्ह्यात वाळू तस्करी जोमात सुरू आहे. प्रत्येक तालुक्‍यात तहसीलदार कारवाई करीत आहेत. पण जुजबी दंड वगळता तस्करी रोखण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत. उलट कुणी रोखण्याचा प्रयत्न केलाच तर त्यांच्या अंगावर गाडी घालणे, मारहाण करणे असे प्रकारही माफियांनी केलेत. हे प्रकार सरकार बदलले तरी सुरू राहतातच. या माफियांना सर्वच राजकीय नेत्यांचा वरदहस्त आणि महसूलचा आशीर्वाद असल्याने सरकार कुणाचे असले तरी फरक पडत नाही. त्यामुळे सरकारने कितीही घोषणा केल्या तरी वाळू माफियांवर कारवाई होत नाही, हेच स्पष्ट दिसते.

जिल्ह्यात वाळू तस्करीला ऊत आला आहे. विशेष करून दुष्काळी तालुक्‍यांत वाळू तस्करी जोमाने सुरू आहे. खरे तर या तालुक्‍यांत वाळू उपशाला बंदी असल्याने तेथे वाळूचे लिलाव प्रशासन काढत नाही. पण तेथून होणाऱ्या तस्करीला त्यांचा आशीर्वाद असतो हे आता लपून राहिलेले नाही. गेल्या वर्षी जिल्ह्यात अशा अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करून तीन कोटी १७ लाखांचा दंड वसूल केला होता. त्यातील दोन कोटींपेक्षा जास्त दंड जत, कवठेमहांकाळ, तासगाव आणि आटपाडी या तालुक्‍यांतून वसूल झाला होता.

वाळू तस्करीत व्हाईट कॉलर्डही
या काळ्या सोन्यातून मोठी कमाई करण्यासाठी तालुक्‍यात अवैध वाळू व्यवसाय जोमात सुरू आहे.  यात अनेक तस्कर तर आहेत. शिवाय त्यांना हाताशी धरून, पैशाचे भांडवल पुरवून अनेक ‘व्हाईट कॉलर्ड’ही उतरले आहेत. ही तस्करी रोखण्यासाठी महसूल विभाग कठोर पावले उचलत नाही. आर्थिक लागेबांधे असल्याने तस्कर सुसाट आहेत; मात्र त्यातूनही जर हे लागेबांधे विस्कटले तर अवैध वाळू तस्करी रोखण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातून अनेक वेळा कडेगाव, जत, तासगाव या तालुक्‍यांत तहसीलदार, नायब तहसीलदार, कोतवाल, तलाठी यांच्या अंगावर डंपर, ट्रॅक्‍टर, ट्रक अशी वाहने घालण्याचेही प्रकार झालेत. काही वेळा महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत मजल गेली आहे.

एकत्र कारवाई का नाही ?
वाळू तस्करांविरोधात महसूल- पोलिसांनी एकत्र कारवाई करावी, अशी सूचना महसूल मंत्र्यांनी केली आहे. मात्र तरीही पोलिसांना टाळून फक्त महसूलचे पथक का  जाते? हा प्रश्‍न आहे. शिवाय जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई होत नाही हेही धक्कादायकच आहे. वाळू माफियांना मोका लावण्याच्या घोषणा झाल्या तरी तशीही कारवाई आजवर झालेली नाही. त्यामुळे वाळू माफियांशी असलेल्या आर्थिक लागेबांध्याचा संशय गडद होतो.

वाहनांची पळवापळवी
तहसीलदारांनी पकडलेले वाळूचे ट्रकही तहसील कार्यालय आवारातून पळवून नेण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र त्याची फिर्याद देतानाही अज्ञात व्यक्तीने ते पळवून नेल्याची जुजबी तक्रार दिली जाते. असे का? नंतर हे सगळे प्रकरण थंड केले जाते. अशी प्रकरणे आर्थिक व्यवहाराशिवाय थंड होणे शक्‍य आहे का?

राजकीय वरदहस्त?
वाळू तस्करांना राजकीय वरदहस्त असतो हे उघड आहे. पण कुणाचा? युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्‍वजित कदम यांनी भाजप नेत्यांवर असा आरोप केला आहे. 

यापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार असताना वाळू तस्करांना त्यांचा आशीर्वाद असल्याचा आरोप झाला होता. सत्ता कुणाचीही असो, एकूणच वाळू तस्कर हा सत्ताधाऱ्यांच्या जवळ असतो हेच खरे. मग सत्तेतला पक्ष कुणाचा हे त्याला महत्त्वाचे नसते.

Web Title: Smuggling of sand in the sangli district