सामाजिक उपक्रमांतून ‘सकाळ’चा ठसा - मनोज साळुंखे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

सांगली - ‘सकाळ’ हे आता फक्त वृत्तपत्र राहिले नसून विविध सामाजिक उपक्रमांमधून समाजाशी ऋणानुबंध जोडणारी आणि सामाजिक भान जपणारी संस्था झाली आहे. दुष्काळी गावांमध्ये तलावातील गाळ काढणे, ‘तनिष्का’च्या माध्यमातून महिलांना व्यासपीठ मिळवून देणे आदी उपक्रमांमधून ‘सकाळ’ने आपला वेगळा ठसा उमटवला आहे, असे प्रतिपादन कार्यकारी संपादक मनोज साळुंखे यांनी केले.

विष्णुदास भावे नाट्य मंदिरात ‘सकाळ’च्या ३३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘हेल्थ आयकॉन’ या जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञांचे लेख असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी प्रसिद्ध लेखक अतुल कहाते, कार्यकारी संपादक मनोज साळुंखे, उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, उपसरव्यवस्थापक (जाहिरात) उमेश पिंगळे, सहयोगी संपादक शेखर जोशी उपस्थित होते.

या वेळी कार्यकारी संपादक मनोज साळुंखे यांनी ‘सकाळ’च्या वाटचालीचा आढावा घेतला. ते म्हणाले, ‘‘सकाळ’ने तनिष्का, यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन), महान राष्ट्र नेटवर्क (एमआरएन) यांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाशी संबंध जोडला आहे. महिला सक्षमीकरणाच्या चळवळीबरोबरच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे संघटन आणि गावोगावच्या तरुणांचे नेटवर्क यांच्या माध्यमातून समाजातील प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज नवीन तंत्रज्ञानामुळे बातमी सेकंदात समजते. माध्यमे गतिमान झाली आहेत. कोल्हापुरात पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी लोकांमध्ये प्रबोधन केले. अंत्यसंस्कारानंतर नदीत रक्षा विसर्जन करू नये म्हणून प्रबोधन केले. त्याची लोकचळवळ झाली. दाजीपूर अभयारण्यात वाचकांच्या, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबवली. ‘सकाळ’ने ई सकाळ, ॲप, ट्‌विटर, फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातूनही वाचकांपर्यंत वेगाने बातम्या पोचवण्यात आघाडी घेतली आहे.’’

लेखक कहाते यांनी हेल्थ आयकॉन पुस्तिकेचे कौतुक केले. या पुस्तिकेमुळे वाचकांना तज्ज्ञ डॉक्‍टरांचे लेख, आरोग्याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. सहयोगी संपादक शेखर जोशी यांनी प्रास्ताविक केले.