सामाजिक जाणिवांची उभारणार गुढी

सामाजिक जाणिवांची उभारणार गुढी

कोल्हापूर - गुढी पाडव्याच्या निमित्ताने नववर्षाचे स्वागत करताना यंदाही सामाजिक जाणिवांची गुढी उभारली जाणार आहे. पर्यावरण, पाणी वाचवा, असा संदेश देत विविध उपक्रम होतील; तर कडुनिंबाच्या रोपांचे वितरणही काही ठिकाणी होणार आहे. दरम्यान, नववर्षाच्या स्वागतासाठी बाजारपेठ सज्ज झाली असून यंदाही विविध ऑफर्सचा खजिना लुटता येणार आहे. सर्व प्रकारच्या मोबाइल्सवर इन्शुरन्स फ्री मिळणार आहे. अशा विविध ऑफर्सचे फलक आता सर्वत्र झळकू लागले आहेत. त्याशिवाय मुहूर्तावर गुंतवणूकही मोठ्या प्रमाणावर होणार आहे. 

काही निसर्गप्रेमी संस्थांतर्फे गुढी पाडव्याच्या निमित्ताने कडुनिंबाची झाडे लावण्याचे आवाहन केले आहे. निसर्गमित्र संस्थेने गुढीबरोबरच कडुनिंबाची एक वर्षाची झाडे असलेल्या कुंड्यांचे पूजन करून ती रोपे दत्तक देण्याचे नियोजन केले आहे. त्याशिवाय धान्याची साठवणूक करताना रासायनिक पावडरऐवजी कडुनिंबाचा वापर करावा, यासाठी जागरही होणार आहे.

जिल्ह्यातील अनेक गावांत ‘गुढीची काठी दान’ हा उपक्रम राबवला जाणार आहे. गुढीदानातून संकलित झालेल्या काठ्यांपासून ट्री गार्ड बनवून परिसरातील झाडांचे जतन व संवर्धन केले जाणार आहे. काही ठिकाणी सर्वधर्मसमभावाची गुढी उभारली जाणार आहे. यंदाच्या या उपक्रमांना ‘पाणी वाचवा’ या सामाजिक संदेशाची झालर लाभणार आहे.    

दरम्यान, आज पाडव्याच्या पूर्वसंध्येला विविध रंगांतील साखरेच्या गाठी, चाफ्याची फुले, कडुनिंबाचे, आंब्याचे डहाळे, रेशमी वस्त्र, कलश, गुढी खरेदीसाठी महालक्ष्मी मंदिर परिसरासह शहरातील प्रमुख चौकांत गर्दी राहिली. वाढत्या फ्लॅट संस्कृतीमुळे आता तयार गुढ्यांनाही आज मोठी मागणी राहिली. दीडशे रुपयांपासून त्या उपलब्ध होत्या. यंदा सहा ते सात फुटाच्या तयार गुढ्याही बाजारात उपलब्ध होत्या. त्यालाही मोठी मागणी राहिली. ‘दिवाळी पहाट’सारख्या ‘चैत्रपालवी पहाट’ कार्यक्रमांचे आयोजनही आज रात्रीपासूनच सर्वत्र सुरू झाले.  

कोट्यवधींची होणार उलाढाल
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला मुहूर्त साधताना खरेदीचा उत्सव रंगणार आहे. शाळाशाळांत पाटीपूजनासह नवीन प्रवेशाची धामधूम असेल. विविध शोरुम्स, गृहप्रकल्प, उद्योगांचा प्रारंभही होणार असून या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठेत उत्साहाला उधाण आले आहे. चैत्र शुक्‍ल प्रतिपदेला पंचांगातील संवत्सर वाचनाची प्रथा आहे. त्यामुळे पंचांग खरेदीसाठीही मोठी गर्दी झाली. बाजारात आंबाही दाखल झालेला आहे. दर चढे असले तरीही अनेकांनी आंबा खरेदीही केली. ऑटोमोबाइल, रिअल इस्टेट, गारमेंट, इलेक्‍ट्रॉनिक्‍स अशा सर्वच क्षेत्रांत ऑफर्सचा धमाका आहे. तीन हजारांपासून तीन लाखांपर्यंतच्या अत्याधुनिक सायकली आणि हेल्थ इक्विपमेंटस्‌सह शिलाई मशीननाही मोठी मागणी राहणार आहे.

डिजिटल इंडिया
‘डिजिटल इंडिया’, ‘कौशल्य विकास’ या संकल्पना तळागाळात रुजवताना आता संगणकीय ज्ञान अतिशय महत्त्वाचे ठरू लागले आहे. त्यासाठी विविध दहावी-बारावीनंतरचे कोर्सेसही उपलब्ध झाले आहेत. विविध योजनांखाली आता हे कोर्सेस शिकण्याची सोय उपलब्ध झाली असून काही क्‍लासेसनी ‘गुढीपाडव्याला उभारा कॉम्प्युटरची गुढी’ अशी जाहिरात करताना मोफत प्रवेशाची हमी दिली आहे. एका कोर्सवर दुसरा कोर्स फ्री, अशाही जाहिराती झळकू लागल्या आहेत. 

असाही संदेश
गुढीची काठी सरळ असते. आपल्या अंगी सरलता, नम्रता या गोष्टी असाव्यात, असे ती सांगते. आकाशाला गवसणी घालताना ती कार्पोरेट भाषेत आपापले ‘गोल’ शिकवते. डोईवर असणारा उलटा कलश ‘ज्यांच्या अंगणात झुकले ढग, त्यांनी ओंजळ पाणी द्यावे’ अशी शिकवण देतो, तर त्याखालचे एकेक धाग्याने विणलेले वस्त्र जनकल्याणाचे प्रतीक. कडू कडुलिंब आणि गोड साखरेची माळ हे आयुष्य बॅलन्स करायला शिकवतात.अशा आशयाच्या संदेशाची देवाण-घेवाणही सोशल मीडियावरून सुरू झाली आहे.

मुली व महिलांसाठी ‘सेल्फी वुईथ गुढी’ स्पर्धा 
सकाळ मधुरांगण परिवारातर्फे गुढीपाडव्यानिमित्त मुली आणि महिलांसाठी ‘सेल्फी वुईथ गुढी’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. आपापल्या घरासमोरील गुढीसमोर सेल्फी घेऊन ती स्पर्धेसाठी पाठवायची आहेत. सेल्फीबरोबर स्वतःचे नाव आणि संपर्क क्रमांक आवश्‍यक आहे. मंगळवारी (ता. २८) सायंकाळी पाचपर्यंत खालील ईमेल आयडीवर सेल्फी पाठवावेत, असे आवाहन मधुरांगण परिवाराने केले आहे. ई-मेल आयडी असा- jayashri.desai@esakal.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com