सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मेसेज ठरतील धोकादायक!

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मेसेज ठरतील धोकादायक!

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचार धूमधडाक्‍यात सुरू आहे. नेत्यांचे कट्टर कार्यकर्ते आपापल्या नेत्यासाठी प्रचारासाठी दिवसरात्र राबत आहेत. मतदारांचे उंबरे झिजवत सोशल मीडियावर प्रचाराचे रान उठवत आहेत. सोशल मीडियावरील प्रचाराचे काम जबाबदारीचे आहे. मेसेजमधून कुणावर बोचरी अथवा वैयक्‍तिक टीका होऊ नये; तसेच मेसेजमध्ये फेरफार केला जाऊ नये. तसे घडल्यास संबंधिताला माहिती व तंत्रज्ञान कायदा 2000 (सुधारित 2008) अंतर्गत शिक्षेची तरतूद आहे.

व्हॉट्‌स-ऍप आणि फेसबुक ही राजकीय प्रचाराच्या दृष्टीने हॉट समाजमाध्यमे आहेत. यावरून प्रचार होण्यात गैर काही नाही; पण तो कसा करावा, याचे भानही सुटता कामा नये. त्यासाठी उमेदवारांनीसुद्धा कार्यकर्त्यांचे "ब्रेन वॉश' करायला हवे. प्रचाराची मर्यादा आखून घ्यावी अन्यथा उत्साही कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या चुकीच्या प्रचारामुळे कार्यकर्ता गुन्ह्यात अडकू शकतो. कोकणात निवडणुकीच्या दरम्यान असाच एक प्रकार घडला. एका उमेदवाराच्या कार्यकर्त्याने थेट शासकीय मेसेजमध्येच फेरफार केला आणि तो माहिती व तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हेगार ठरला.

झाले असे, की मतदानापूर्वी अठ्ठेचाळीस तास अगोदरच प्रचाराची मुदत संपली होती. मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी व मतदानाची वेळ मतदारांना समजावी, याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय यंत्रणेद्वारे मोबाइलधारकांना संदेश पाठविला, की voting on 17 April 2014 from 07 :00 am to 06 : 00 pm. Do exercise ur voting right. (आपल्या मतदानाचा हक्क अवश्‍य बजावा.) District collector. पण, त्या उत्साही कार्यकर्त्याने या मेसेजमध्ये बदल करून आपल्या आवडत्या नेत्याचे नाव लिहून त्यांना मत द्यावे - District collector, असा केला. हा मेसेज त्याने निवडणुकीच्या प्रचाराची मुदत संपल्यानंतर पाठविला. या प्रकरणात मुद्दा प्रचाराची मुदत संपल्यानंतरचा तर आहेच, शिवाय त्यात फेरफार करण्याबाबतचाही आहे. त्यामुळे या कार्यकर्त्याविरूद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली. भारतीय लोकप्रतिनिधी अधिनियम व माहिती तंत्रज्ञान अधिनियमच्या (सुधारित 2008) तरतुदींनुसार सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद दाखल करून घेण्यात आली.
त्यामुळे निवडणूकीचा प्रचार करताना कार्यकर्त्यांनी आक्षेपार्ह मेसेज पाठवू नयेत. असे मेसेज कार्यकर्त्यांना शिक्षा ठोठावू शकतात. त्यामुळे कार्यकर्त्यांनी निवडणुकांत तारतम्य ठेवूनच मेसेज पाठवायला हवेत.

- हेमंतकुमार शहा, पोलिस निरीक्षक, कणकवली पोलिस ठाणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com