गायकवाड साहेब; मलाही द्या गैरव्यवहाराची परवानगी ! - बर्वे 

गायकवाड साहेब; मलाही द्या गैरव्यवहाराची परवानगी ! - बर्वे 

सांगली - सामाजिक कार्यकर्ते वि. द. बर्वे यांनी आता शासकीय अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना अर्थपूर्ण तडजोडीसाठी परवानगी मागितली आहे. त्यांच्या या पवित्र्याला माहिती आयुक्त कसा प्रतिसाद देतात याबद्दल कुतूहल आहे. यापूर्वी माहिती अधिकार कायद्याला कोलदांडा घालण्याच्या प्रशासकीय निबरटपणाला कंटाळून माहिती अधिकार अर्जांची होळी बर्वे यांनी केली होती.

श्री बर्वे यांनी महापालिकेतील अनेक गैरकारभार आजवर माहिती अधिकारांतर्गत पाठपुरावा करून चव्हाट्यावर आणला आहे. काही प्रकरणात त्यांनी न्यायालयात धाव घेऊन हजार ते बाराशे कोटींचे दावे जिंकले आहेत. मात्र प्रशासनाच्या निगरगट्ट कारभारामुळे या निकालांकडे दुर्लक्ष करून नगर विकास खात्याने पै ची वसुली केलेली नाही. नगर विकास खाते एकाही माहिती अर्जाची दखल घेत नाही. गेल्या चार वर्षातील या अनुभवामुळे निराश झालेल्या श्री बर्वे यांनी आता माहिती आयुक्त, राज्यपाल आणि आणि सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांना लेखी पत्र देऊन जगावेगळी परवानगी मागितली आहे.

श्री. बर्वे यांनी अर्जात म्हटले आहे की; माहिती कशी नाकारायची यात अधिकाऱ्यांची पीएचडी झाली आहे. जोडपत्र अ ते क पर्यंतचा माहिती अधिकारातील प्रवासासाठी पाच वर्षे जातात. तरीही माहिती दिली जात नाही. अंतिम आदेशात कोणतीही दंडात्मक कारवाई केली जात नाही. कलम अठराचा प्रवास सुरु झाल्यानंतर आणखी तीन चार वर्षे जातात. तेथेही सर्व स्तरावर तडजोडी होतात. अखेर माहिती मागवणारा भंपक ठरतो. तो वैतागतो. माझ्या सहा महिन्यापुर्वी लागलेल्या तक्रारीच्या निकालाची कार्यवाही होत नाही. अखेर त्या निकालाची महापालिकेच्या दारात होळी केली तरी साधी दखलही घेतली जात नाही. या सर्व प्रवासात माहितीही नको आणि हेलपाटेही नकोत अशी माझी अवस्था झाली आहे. आता पूर्ण कंटाळून मला चोरांच्या टोळीत सामील व्हावे असे वाटू लागले आहे.

श्री. बर्वे म्हणाले, आपण एकटेच भंपकासारखे कायदेशीर लढण्यात अर्थ नाही अशी माझी मानसिकता झाली आहे. यासाठी नम्र विनंती की आता मला अर्थपूर्ण तडजोडी करण्यासाठी परवानगी मिळावी. त्यामुळे उत्तर आयुष्यात आपण इतरांसारखेच आहोत याचे समाधान मला मिळेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com