सोलापूर: बांधकाम परवाना मिळणार 45 दिवसांत 

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 12 जुलै 2017

शासन आदेशानुसार महापालिकेत प्रक्रिया सुरू केली जाईल. परिपूर्ण अर्ज असतील तर परवाना दिलेल्या मुदतीपेक्षाही अगोदर मिळू शकतो. अपूर्ण व अर्धवट अर्ज असतील तर त्याची माहिती अर्जदारांना देऊन, अर्ज परिपूर्ण पद्धतीने भरून घेतले जातील. 
- लक्ष्मण चलवादी, नगरअभियंता सोलापूर महापालिका

सोलापूर - राज्यातील नागरिकांना बांधकाम परवाना आता केवळ 45 दिवसांत मिळणार आहे. या संदर्भातील आदेश नगरविकास विभागाने मंगळवारी जारी केला असून, त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. पूर्वी परवाना देण्यासाठी 60 दिवसांचा कालावधी होता. 

महापालिकेतील सर्वांत क्‍लिष्ट प्रक्रिया कोणती, तर ती बांधकाम परवाना मिळवण्याची, असा अनुभव बहुतांश मिळकतदारांना येतो. डीसीआर प्रणाली सुरू झाल्यापासून परवाना देण्यामध्ये तत्परता आली होती. आता शासनाने परवाना देण्याचा कालावधी 45 दिवसांचा केल्यामुळे त्याचा निश्‍चित फायदा संबंधितांना होणार आहे. 

मिळकतदाराने अर्ज केल्यानंतर बांधकाम परवाना देण्यासाठी 30 दिवस, जोता तपासण्यासाठी सात दिवस आणि वापर परवाना देण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. परिपूर्ण अर्ज असूनही या कालावधीत बांधकाम परवान्याची प्रक्रिया पूर्ण न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर शास्तीची कारवाईही होऊ शकते. या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने सुरू करण्याच्या सूचना शासनाने संबंधित विभागाना दिल्या आहेत.